Saturday, September 5, 2026
HomeChamorshiचामोर्शी पंचायत समितीची इमारत जीर्णावस्थेत; दुरुस्तीला तातडीची गरज...

चामोर्शी पंचायत समितीची इमारत जीर्णावस्थेत; दुरुस्तीला तातडीची गरज…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

भिंती व छताची दुरवस्था; कर्मचारी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर,

गडचिरोली /चामोर्शी,२३ ऑगस्ट २०२६::- ग्रामीण भागातील नागरिकांच्या शासकीय कामकाजाचे प्रमुख केंद्र असलेल्या चामोर्शी पंचायत समितीच्या इमारतीची अवस्था दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. इमारतीच्या भिंती, छत तसेच अन्य भागांची मोठ्या प्रमाणात झीज झाल्याने कर्मचारी आणि विविध कामांसाठी पंचायत समितीत येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पावसाळ्यात छताला गळती लागण्याची शक्यता असून, इमारतीतील काही भागांमध्ये तडे व झीज झाल्याने भविष्यात दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे ‘दुर्घटना घडण्याची वाट न पाहता प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात’, अशी मागणी जोर धरत आहे.

पंचायत समितीमार्फत ग्रामीण विकासाची विविध कामे, शासकीय योजना तसेच नागरिकांशी संबंधित प्रशासकीय कामकाज चालते. त्यामुळे ही इमारत सुरक्षित आणि सुस्थितीत असणे अत्यावश्यक आहे. जीर्ण इमारतीमुळे कर्मचारी व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

दुरुस्तीचा प्रस्ताव मंत्रालयाकडे :-

दरम्यान, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. प्रस्तावात काही त्रुटी आढळल्यानंतर आवश्यक दुरुस्ती करून तो पुन्हा मंत्रालयाकडे पाठविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र प्रस्तावाच्या प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम कधी सुरू होणार, याकडे चामोर्शीकरांचे लक्ष लागले आहे. निधी मंजूर होऊन काम सुरू होईपर्यंत इमारतीची अवस्था आणखी बिकट झाल्यास जबाबदारी कोणाची, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सुरक्षा ऑडिट करून तात्पुरत्या उपाययोजना करण्याची मागणी :-

प्रशासनाने केवळ प्रस्तावाच्या मंजुरीची प्रतीक्षा न करता पंचायत समिती इमारतीची तातडीने प्रत्यक्ष पाहणी व सुरक्षा ऑडिट करावे. धोकादायक भाग आढळल्यास तेथे तात्पुरत्या स्वरूपात आवश्यक उपाययोजना करून कर्मचारी व नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी होत आहे.

दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संभाव्य धोका वेळीच ओळखून त्यावर कार्यवाही करणे गरजेचे आहे. त्यामुळे मंत्रालयाकडून दुरुस्ती प्रस्तावाला तातडीने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी अपेक्षा चामोर्शीकरांकडून व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular