VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूनंतर प्रशासनाची कठोर भूमिका; तपासणी करूनही गंभीर त्रुटींकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका,
गडचिरोली ,२३ ऑगस्ट २०२६::- धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने अखेर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता, आरोग्य व मूलभूत सुविधांमधील गंभीर त्रुटींच्या तपासणीत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) पी. पी. सादमवार आणि तत्कालीन प्रभारी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एस. एन. कन्नाके यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. नागपूरच्या अपर आयुक्त, आदिवासी विकास आयुषी सिंह यांनी २१ ऑगस्ट रोजी निलंबनाचे आदेश जारी केले आहेत.
चौकशीदरम्यान आश्रमशाळेतील शौचालये व स्नानगृहे अस्वच्छ व अपुरी असल्याचे, विद्यार्थिनींच्या वसतिगृह परिसरात कचरा व लाकूडफाटा पडून असल्याचे तसेच प्रथमोपचार पेटीचीही सुविधा उपलब्ध नसल्याचे समोर आले. विद्यार्थिनींच्या निवासव्यवस्थेतही त्रुटी आढळल्या होत्या. बोअरवेलच्या पाण्याचे योग्य शुद्धीकरण न करता वापर होत असल्याचेही निदर्शनास आले.
विशेष म्हणजे, संबंधित अधिकाऱ्यांनी यापूर्वी आश्रमशाळेची पाहणी केली होती. मात्र, पाहणीदरम्यान आढळलेल्या गंभीर त्रुटींची योग्य नोंद करून त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबतच्या देखरेख यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
जपतलाई आश्रमशाळेत १० ऑगस्ट रोजी सर्पदंशाच्या घटनेत तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शाळेच्या व्यवस्थापनावरही कारवाई करण्यात आली असून, संबंधित प्रकरणात गुन्हेगारी तपास सुरू असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे केवळ निलंबनाची कारवाई पुरेशी आहे का, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतील त्रुटींसाठी आणखी कोणावर जबाबदारी निश्चित होणार, याकडे आता पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
तीन निष्पाप विद्यार्थिनींच्या मृत्यूनंतर प्रशासनाने आश्रमशाळांच्या तपासणी आणि देखरेखीच्या यंत्रणेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे. दुर्गम भागातील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे, यासाठी नियमित तपासणीसोबतच त्रुटींवर तातडीने कार्यवाही होणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.
