VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
७ वर्षीय देवांश सदुलवार ठरला यात्रेचा आकर्षणाचा केंद्रबिंदू; अनवाणी पायी कावड घेऊन पूर्ण केली यात्रा,
गडचिरोली /चामोर्शी,२३ ऑगस्ट २०२६::- पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून चामोर्शी ते श्री मार्कंडेश्वर देवस्थान, मार्कंडा अशी भव्य पायी कावड यात्रा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. परिसरातील शेकडो शिवभक्तांनी या यात्रेत उत्स्फूर्त सहभाग घेत ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषाने संपूर्ण मार्ग दुमदुमून टाकला.
महिला व पुरुष भाविकांनी फुलांनी, मोरपिसांनी तसेच विविध आकर्षक रंगांनी सजवलेल्या कावडी खांद्यावर घेत भक्तिभावाने मार्कंडाच्या दिशेने पायी प्रस्थान केले. पावसाची रिपरिप सुरू असतानाही भाविकांचा उत्साह आणि महादेवावरील श्रद्धा तसूभरही कमी झाली नाही.
७ वर्षीय देवांश ठरला यात्रेचा खास आकर्षण :-

या कावड यात्रेतील विशेष आकर्षण ठरला तो अवघ्या ७ वर्षीय बाल शिवभक्त देवांश दीपक सदुलवार. एवढ्या लहान वयात त्याने चिमुकल्या खांद्यावर कावड घेत अनवाणी पायाने संपूर्ण पायी यात्रा पूर्ण केली.
पावसाची रिपरिप, लांबचा पायी प्रवास आणि श्रम यांची पर्वा न करता देवांशने दाखवलेली श्रद्धा, जिद्द आणि उत्साह उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता. त्याचा भक्तिभाव पाहून ज्येष्ठ शिवभक्तांसह नागरिकांनी त्याचे मनापासून कौतुक केले.
मार्कंडेश्वराच्या चरणी जलाभिषेक :-
मार्कंडा येथे पोहोचल्यानंतर सर्व शिवभक्तांनी श्री मार्कंडेश्वर महादेवाचे दर्शन घेत पवित्र जलाने जलाभिषेक केला. यावेळी सर्वांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि परिसरात सुख-शांती नांदावी, यासाठी महादेवाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.
भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन :-
कावड यात्रेच्या समारोपानंतर प्रथम तुम्पल्लीवार यांच्या वतीने सहभागी सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. भक्तांनी मोठ्या श्रद्धेने महाप्रसादाचा लाभ घेतला. या सेवाभावी उपक्रमामुळे यात्रेच्या भक्तिमय वातावरणात आणखी भर पडली.
श्रद्धा, भक्ती, सेवा, एकजूट आणि उत्साहाचा सुंदर संगम ठरलेली चामोर्शी ते मार्कंडा कावड यात्रा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरली. विशेषतः बाल शिवभक्त देवांश सदुलवारच्या भक्तीमय सहभागाने या यात्रेला एक वेगळे आणि प्रेरणादायी रूप प्राप्त झाले.
