VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
चामोर्शी/(मार्कंडादेव ),२४ ऑगस्ट २०२६ ::- विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री मार्कंडेश्वर देवस्थान, मार्कंडादेव येथे श्रावण महिन्याच्या पावन पर्वानिमित्त आज, सोमवार दि. २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य ‘महागंगा आरती’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
वैनगंगा नदीच्या पवित्र तीरावर भक्तिमय वातावरणात होणाऱ्या या महाआरतीसाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. भगवान श्री मार्कंडेश्वराच्या सान्निध्यात आणि वैनगंगा नदीच्या पावन तीरावर दीपप्रज्वलन, आरती व भक्तिमय वातावरणात हा धार्मिक सोहळा पार पडणार आहे.
श्रावणातील प्रत्येक सोमवारी मार्कंडादेव येथे महागंगा आरतीचे आयोजन केले जाते. या उपक्रमामुळे परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण होत असून, दूरवरूनही भाविक मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित राहत आहेत.

सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या महागंगा आरतीमध्ये जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी होऊन या मंगलमय सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन श्री मार्कंडेश्वर देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
