Saturday, September 5, 2026
HomeEtapalliअचानक तपासणीत ९ शिक्षक गैरहजर; शिक्षण विभागावर ?...

अचानक तपासणीत ९ शिक्षक गैरहजर; शिक्षण विभागावर ?…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

एटापल्लीत अचानक शाळा तपासणी; ९ शिक्षक गैरहजर आढळल्याने शिक्षण विभागात खळबळ,

गडचिरोली/एटापल्ली,२४ ऑगस्ट २०२६::- एटापल्ली तालुक्यातील शाळांमध्ये शिक्षकांची उपस्थिती आणि शैक्षणिक कामकाजाची पाहणी करण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी अचानक शाळांना भेटी दिल्या. या तपासणीदरम्यान तब्बल ९ शिक्षक शालेय वेळेत गैरहजर आढळून आल्याने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.

दुर्गम व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, तसेच शाळांमध्ये शिक्षकांची नियमित उपस्थिती राहावी, यासाठी शिक्षण विभागाकडून वेळोवेळी शाळांची तपासणी केली जाते. त्याच अनुषंगाने गटशिक्षणाधिकारी ऋषिकेश बुरडकर यांनी दि. १८ व १९ ऑगस्ट रोजी तालुक्यातील विविध शाळांना अचानक भेटी देऊन पाहणी केली.

या तपासणीमध्ये कसनसूर आणि कोटमी केंद्रांतर्गत विविध शाळांमध्ये ९ शिक्षक अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, कोणतीही पूर्वकल्पना नसताना करण्यात आलेल्या या तपासणीमुळे शिक्षकांच्या उपस्थितीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

गैरहजर आढळलेल्या संबंधित शिक्षकांना शिक्षण विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, निर्धारित मुदतीत स्पष्टीकरण साद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधितांचे स्पष्टीकरण समाधानकारक नसल्यास नियमानुसार पुढील प्रशासकीय कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी शिक्षकांची उपस्थिती आणि अध्यापन प्रक्रियेवर अधिक काटेकोरपणे लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे. अचानक तपासणीच्या माध्यमातून गैरहजेरीवर नियंत्रण आणण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असल्याचेही दिसून येत आहे.

शिक्षकांची गैरहजेरी केवळ प्रशासकीय बाब नसून त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular