Saturday, September 5, 2026
HomeChamorshi"आताची मोठी बातमी" माता-बाळाचा मृत्यू; चामोर्शी रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह...

“आताची मोठी बातमी” माता-बाळाचा मृत्यू; चामोर्शी रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली /चामोर्शी,२४ ऑगस्ट २०२६::- प्रसूतीसाठी चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेचा प्रसूतीनंतर नवजात बाळासह दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, ग्रामीण रुग्णालयातील उपचारपद्धती आणि आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला प्रसूतीसाठी चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली होती. प्रसूतीनंतर आई आणि बाळाची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथे रेफर करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर मृत महिलेच्या कुटुंबीयांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रुग्णाच्या प्रकृतीतील बिघाडाची वेळीच दखल घेण्यात आली का, आवश्यक उपचार वेळेत मिळाले का आणि गडचिरोली येथे रेफर करण्याचा निर्णय योग्य वेळी घेण्यात आला का, याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत. कुटुंबीयांकडून संबंधित वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत निष्काळजीपणाचे आरोप करण्यात येत आहेत.

डॉक्टरांसह दोन परिचारिकांना शोकॉज नोटीस :-

या गंभीर घटनेबाबत चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रविणकुमार किलनाके यांच्याशी विचारणा केली असता, संबंधित डॉक्टर आणि दोन परिचारिकांच्या निष्काळजीपणाबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संबंधितांना शोकॉज नोटीस बजावून दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

आरोग्य व्यवस्थेचा पुन्हा आढावा घेण्याची गरज :-

ग्रामीण भागातील गर्भवती महिलांसाठी चामोर्शी ग्रामीण रुग्णालय हे महत्त्वाचे आरोग्य केंद्र आहे. त्यामुळे प्रसूती विभागात आवश्यक डॉक्टर, परिचारिका, औषधोपचार, वैद्यकीय उपकरणे आणि आपत्कालीन सेवा सक्षम असणे अत्यावश्यक आहे.

माता आणि नवजात बाळाचा मृत्यू ही अत्यंत गंभीर बाब असून, या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून नेमकी चूक कुठे झाली, याचा शोध घेण्याची गरज आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासोबतच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ग्रामीण रुग्णालयातील प्रसूती व आपत्कालीन सेवा अधिक सक्षम करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

माता आणि बाळाच्या मृत्यूमागील नेमके कारण काय? उपचारात कुठे त्रुटी राहिली? याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार असून, प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular