Saturday, September 5, 2026
HomeChamorshiभेंडाळा अंगणवाडीत चक्क नागाचा वावर; चिमुकल्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर...

भेंडाळा अंगणवाडीत चक्क नागाचा वावर; चिमुकल्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली /भेंडाळा,२६चामोर्शी तालुक्यातील अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दहेगाव अंगणवाडीत साप आढळल्याची घटना ताजी असतानाच, भेंडाळा येथील अंगणवाडी केंद्रात चक्क नाग आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे अंगणवाडीतील चिमुकले, सेविका तसेच पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लहान मुलांच्या संगोपनासह पूर्वप्राथमिक शिक्षणाचे केंद्र असलेल्या अंगणवाड्या सुरक्षित आणि स्वच्छ असणे अपेक्षित आहे. मात्र, परिसरातील वाढलेली झाडाझुडपे, कचरा आणि अस्वच्छतेमुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अंगणवाडी चिमुकल्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान असावे की सापांच्या वावराचे ठिकाण? असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे, दहेगाव अंगणवाडीत साप आढळल्याची घटना घडून काही दिवस उलटत नाहीत तोच भेंडाळा अंगणवाडीत नाग आढळल्याने संबंधित यंत्रणेच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वारंवार अशा घटना घडत असतानाही प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना का केल्या जात नाहीत, असा सवालही नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

अंगणवाडीत दररोज चिमुकली मुले येत असल्याने एखाद्या विषारी सापाचा दंश झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होण्याची वाट न पाहता, तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे.

अंगणवाडी परिसरातील झाडाझुडपे व गवत तातडीने हटविणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे, परिसराची नियमित स्वच्छता करणे तसेच इमारतीची आवश्यक डागडुजी व सुरक्षा तपासणी करणे गरजेचे आहे. संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून सर्व अंगणवाड्यांच्या सुरक्षेचे ऑडिट करावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

भेंडाळा आणि दहेगाव येथील घटनांनी प्रशासनाने आता तरी गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. चिमुकल्यांच्या जीविताशी संबंधित प्रश्न असल्याने केवळ तात्पुरती स्वच्छता न करता अंगणवाड्या सुरक्षित व सापमुक्त ठेवण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था उभारावी, अशी जोरदार मागणी पालक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular