VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली /कुरखेडा,२५ ऑगस्ट २०२६::- गडचिरोली जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतुकीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून, स्थानिक गुन्हे शाखा व कुरखेडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत १९ गोवंशीय जनावरांसह दोन चारचाकी वाहने असा एकूण १९ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई २४ ऑगस्ट रोजी रात्री कुरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गेवर्धा गावाजवळ करण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्यातील अवैध व्यवसाय व गैरकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेला गेवर्धा ते केशोरी मार्गावर दोन वाहनांमधून अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक केली जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व कुरखेडा पोलिसांच्या पथकाने गेवर्धा गावाजवळ सापळा रचला. यावेळी ट्रक व महिंद्रा बोलेरो पिकअप अशी दोन संशयित वाहने येताना दिसून आली. पोलिसांनी रस्त्यावर अडथळा निर्माण करून दोन्ही वाहने थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये गोवंशीय जनावरे दाटीवाटीने व निर्दयतेने भरल्याचे आढळून आले. जनावरांच्या वाहतुकीसाठी आरोपींकडे आवश्यक परवाना नसल्याचेही तपासणीत निष्पन्न झाले.
पंचांसमक्ष करण्यात आलेल्या तपासणीत ट्रक क्रमांक टीजी १२ यू ४८९६ मध्ये ११ गायी व २ बैल, तर महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक एमएच ३५ एजे ४६०१ मध्ये ४ गायी व २ बैल आढळून आले. अशाप्रकारे एकूण १९ गोवंशीय जनावरे जप्त करण्यात आली असून त्यांची अंदाजे किंमत २ लाख ६५ हजार रुपये आहे.
यासोबतच अंदाजे १२ लाख रुपये किमतीचा ट्रक आणि ५ लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप अशी वाहने जप्त करण्यात आली. त्यामुळे जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १९ लाख ६५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी शेख इब्राहिम शेख इस्माईल (वय ४०, रा. मेहबुब नगर, पिली नदी, उप्पलवाडी, नागपूर) आणि मुफस्सील कुरेशी मोहम्मद जमील कुरेशी (वय २५, रा. चिराग अली चौक, टेका नई बस्ती, नागपूर) यांच्याविरुद्ध कुरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अप. क्र. १९१/२०२६ अन्वये प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६०, महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९७६ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज. जी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे व कुरखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वंबर कराळे, पोलीस अंमलदार तुषार खोब्रागडे, चालक पोलीस अंमलदार गणेश, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक कुणाल रेगुलवार, पोलीस हवालदार अजीतकुमार सुरजुसे हजर होते.
