VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
३२ गोवंशीय जनावरांसह १९.६० लाखांचा मुद्देमाल जप्त; चार आरोपी अटकेत,
गडचिरोली /आरमोरी,२९ ऑगस्ट २०२६::- गडचिरोली जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतुकीविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली असून, आरमोरी तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि आरमोरी पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत गोवंश तस्करांचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. पोलिसांनी ३२ गोवंशीय जनावरे, दोन चारचाकी वाहने आणि तीन मोबाईल फोन असा एकूण १९ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, तिघांचा शोध सुरू आहे.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार २८ ऑगस्ट रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्रगस्त घालत असताना गोपनीय माहितीच्या आधारे ठाणेगाव-आरमोरी टी-पॉईंट परिसरात सापळा रचण्यात आला.
यावेळी दोन वाहने पायलटिंग करीत असल्याचे दिसून आले. त्यांच्या मागून संशयित आयसर वाहन येताच पोलिसांनी अडथळा निर्माण करून वाहन थांबविले. वाहनातील व्यक्तींनी जंगलाच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून प्रणय समीर जांभुळकर (वय २०, रा. आंधळी, ता. कुरखेडा) याला ताब्यात घेतले.
आयसर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये २६ गायी आणि ६ बैल, अशी एकूण ३२ गोवंशीय जनावरे अत्यंत निर्दयपणे कोंबून भरलेली आढळून आली.
दरम्यान, पायलटिंग करणाऱ्या काळ्या रंगाच्या क्रेटा वाहनाला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन न थांबवता पळ काढला. त्यानंतर मागील स्विफ्ट डिझायर वाहनालाही अडविण्यात आले. या वाहनातील तीन जणांनी जंगलात पळण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी शिताफीने त्यांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शेहबाज सलाम शेख (३१, गडचिरोली), शोहेब फारुक शेख (२७, नागपूर), शेख आकिब नासीर शेख (नागपूर) आणि प्रणय समीर जांभुळकर (२०, आंधळी) यांचा समावेश आहे.
पंचांसमक्ष करण्यात आलेल्या तपासणीत ३२ गोवंशीय जनावरांची अंदाजे किंमत ५ लाख ९५ हजार रुपये, आयसर वाहनाची किंमत सुमारे १० लाख रुपये, तर स्विफ्ट डिझायरची किंमत सुमारे ३ लाख रुपये असल्याचे निष्पन्न झाले. यासोबत तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. अशाप्रकारे एकूण १९ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला.
धक्कादायक बाब म्हणजे, जप्त करण्यात आलेल्या गोवंशीय जनावरांच्या वैद्यकीय तपासणीत ४ गायी आणि २ बैल, अशी एकूण ६ जनावरे मृत आढळून आली.
या प्रकरणी आरमोरी पोलीस ठाण्यात अप. क्र. ३८०/२०२६ अन्वये प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या चारही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्याची कार्यवाही सुरू आहे.
दरम्यान, शहजाद शेख, जमील कुरेशी आणि आयसर वाहनाचा अज्ञात चालक हे फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कांबळे करीत आहेत.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज. जी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे व आरमोरीचे पोलीस निरीक्षक सचिन झनक यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलिसांची धडक मोहीम :-
गडचिरोली जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई अधिक तीव्र केल्याने तस्करांचे धाबे दणाणले आहेत. आरमोरीतील या कारवाईमुळे अवैध गोवंश वाहतुकीच्या साखळीवर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे.
