Wednesday, October 7, 2026
HomeAramoriकोरचीच्या सीताफळ-जांभूळ उत्पादकांसाठी मोठी मागणी; रोपवाटिका, प्रक्रिया केंद्र व शीतगृह उभारण्याचा प्रस्ताव...

कोरचीच्या सीताफळ-जांभूळ उत्पादकांसाठी मोठी मागणी; रोपवाटिका, प्रक्रिया केंद्र व शीतगृह उभारण्याचा प्रस्ताव…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे आमदार रामदास मसराम यांचे निवेदन,

गडचिरोली/ आरमोरी, 07 ऑक्टोबर 2026::–कोरची तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या सीताफळ व जांभूळ उत्पादनाला नवी बाजारपेठ आणि मूल्यवर्धनाची जोड देण्यासाठी अद्ययावत रोपवाटिका, शेतकरी प्रशिक्षण केंद्र, फळ प्रक्रिया केंद्र तसेच आधुनिक शीतगृह उभारण्यात यावे, अशी मागणी आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामदास मसराम यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोरची तालुक्यातील शेतकरी आणि आदिवासी उत्पादक मोठ्या प्रमाणात सीताफळ व जांभूळ पिकांचे उत्पादन घेतात. मात्र दर्जेदार रोपांची उपलब्धता, आधुनिक लागवड तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, प्रक्रिया आणि साठवणुकीच्या सुविधांचा अभाव असल्याने उत्पादकांना अपेक्षित आर्थिक लाभ मिळत नसल्याचे आमदार मसराम यांनी निवेदनात नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर दर्जेदार रोपांची निर्मिती करणारी आधुनिक रोपवाटिका आणि शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सीताफळ-जांभळापासून विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यासाठी फळ प्रक्रिया केंद्र, तर उत्पादनाची नासाडी टाळण्यासाठी आधुनिक शीतगृह व साठवणूक केंद्र उभारण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

यासोबतच स्थानिक शेतकरी उत्पादक गटांना प्रक्रिया, पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सुविधा देण्याची मागणीही करण्यात आली आहे. या सुविधांमुळे फळपिकांचे मूल्यवर्धन होऊन उत्पादकांना त्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळण्यास मदत होणार असून, स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

कोरचीच्या स्थानिक कृषी क्षमतेचा विचार करून या प्रकल्पाला प्राधान्याने प्रशासकीय मान्यता देऊन आवश्यक निधी उपलब्ध करावा आणि रोपवाटिका, प्रशिक्षण केंद्र, प्रक्रिया केंद्र व शीतगृह उभारणीची तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार रामदास मसराम यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular