Saturday, September 5, 2026
HomeAheriअहेरी विधानसभा क्षेत्रातील रस्ते-पुलांची दुरवस्था; राज्याचे बांधकाम मंत्र्यांकडे विकास तोडसाम यांचा पाठपुरावा...

अहेरी विधानसभा क्षेत्रातील रस्ते-पुलांची दुरवस्था; राज्याचे बांधकाम मंत्र्यांकडे विकास तोडसाम यांचा पाठपुरावा…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

सर्किट हाऊस गडचिरोली येथे श्री. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची भेट,

रस्ते-पुलांसह बॅडमिंटन कोर्ट व आधुनिक जिमसाठी निधीची मागणी,

गडचिरोली /अहेरी,२९ ऑगस्ट २०२६::- अहेरी विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण व दुर्गम भागातील रस्ते आणि पुलियांची अवस्था दयनीय झाली असून, नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले असून पुलांचीही दुरवस्था झाल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर अहेरी विधानसभा क्षेत्रातील रस्ते व पुलांची तातडीने दुरुस्ती करून आवश्यक ठिकाणी नवीन बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजप अहेरी तालुकाध्यक्ष विकास तोडसाम यांनी केली.यासंदर्भात त्यांनी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली येथील सर्किट हाऊस येथे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.यावेळी गडचिरोली मतदारसंघाचे आमदार श्री.मिलिंदजी नरोटे, राकेश कोसरे सोशल मिडिया संयोजक अहेरी विधानसभा क्षेत्र, सचिन पोरतेट, सिद्देश सिडाम आदी उपस्थित होते.

पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट :-

अहेरी विधानसभा क्षेत्राचा मोठा भाग ग्रामीण आणि दुर्गम असून अनेक गावांना जोडणारे रस्ते नागरिकांच्या दैनंदिन जीवनाची महत्त्वाची जीवनवाहिनी आहेत. मात्र, अनेक मार्गांची देखभाल व दुरुस्ती वेळेवर न झाल्याने रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. परिणामी अपघाताचा धोका वाढला असून शाळकरी विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पुलियांचीही तातडीने दुरुस्ती आवश्यक :-

अनेक गावांना जोडणाऱ्या मार्गांवरील पुलिया व लहान पुलांची स्थितीही चिंताजनक आहे. काही ठिकाणी पुलांच्या संरचनेला धोका निर्माण झाला असून, पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह वाढल्यास वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित रस्ते व पुलियांची तातडीने पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती, मजबुतीकरण व नव्याने बांधकाम करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.

अहेरी विधानसभा क्षेत्रासाठी रस्ते विकासासाठी भरीव निधीची गरज :-

अहेरी विधानसभा क्षेत्रातील दुर्गम गावांना बारमाही आणि दर्जेदार रस्ते सुविधा मिळणे अत्यंत आवश्यक आहे. रस्त्यांची स्थिती सुधारल्यास नागरिकांचा प्रवास सुलभ होण्यासोबतच शेतमालाची वाहतूक, विद्यार्थ्यांची शाळा-महाविद्यालयात ये-जा आणि आरोग्यसेवांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार आहे.त्यामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातील रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी विशेष निधी उपलब्ध करून देऊन प्रलंबित कामांना गती द्यावी, अशी मागणी विकास तोडसाम यांनी बांधकाम मंत्र्यांकडे केली.

युवकांसाठी बॅडमिंटन कोर्ट व आधुनिक जिमचीही मागणी :-

रस्ते व पुलांच्या प्रश्नासोबतच अहेरीतील युवकांसाठी बॅडमिंटन कोर्ट व आधुनिक जिम उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. अहेरी परिसरातील युवकांना क्रीडा व व्यायामासाठी सुसज्ज सुविधा मिळाल्यास त्यांना निरोगी जीवनशैलीकडे वळविण्यास तसेच स्थानिक पातळीवरून गुणवंत खेळाडू घडविण्यास मदत होणार आहे.

अहेरीच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा :-

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी विधानसभा क्षेत्रातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे विकास तोडसाम यांनी सांगितले. रस्ते, पूल आणि दळणवळणाच्या सुविधा मजबूत करण्यासोबतच युवकांसाठी क्रीडा सुविधा निर्माण करण्यालाही प्राधान्य देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

अहेरी विधानसभा क्षेत्रातील रस्ते व पुलांची दुरवस्था लक्षात घेता शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तातडीने निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामांना सुरुवात करावी, अशी अपेक्षा अहेरीतील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular