VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
प्रस्तावित जमीन अधिग्रहणाविरोधात ७ सप्टेंबरला मार्कंडादेव येथे महाअभिषेक,
मुख्यमंत्री फडणवीसांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांशी संवाद साधावा – महेंद्र ब्राह्मणवाडे,
गडचिरोली/चामोर्शी, ३० ऑगस्ट २०२६::- हिरापूर, राखी, गुरवळा येथील प्रस्तावित विमानतळ तसेच जयरामपूर-मुधोली परिसरातील १३ गावे आणि भेंडाळा परिसरातील १४ गावांमधील प्रस्तावित जमीन अधिग्रहणाच्या विरोधात शेतकऱ्यांचा आवाज आता अधिक बुलंद होत आहे. आपल्या हक्काच्या जमिनी वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘विदर्भाची काशी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मार्कंडेश्वराच्या चरणी साकडे घालण्याचा निर्धार केला आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ७ सप्टेंबर रोजी मार्कंडादेव येथे महाअभिषेकाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी दि. ३० ऑगस्ट रोजी मार्कंडादेव येथील जगन्नाथ बाबा मंदिरात शेतकऱ्यांची बैठक व पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शेतकरी नेते महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी कार्यक्रमाची माहिती देत शासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.
जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा ठाम विरोध :-

प्रस्तावित प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्याच्या हालचालींमुळे संबंधित गावांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेती हीच उपजीविकेचे प्रमुख साधन असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यास त्यांच्या कुटुंबांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने शासनाने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधावा, अशी मागणी करण्यात आली.
“जमीन अधिग्रहण न करता शेतकऱ्यांना न्याय द्यावा. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन आम्ही मार्कंडेश्वराच्या चरणी साकडे घालणार आहोत. मात्र, शासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही. त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी साधी चर्चादेखील होत नाही,” अशी खंत महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केली.
‘मुख्यमंत्र्यांनी स्वतः यावे आणि शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकावे’ :-

शेतकऱ्यांच्या जमिनी वाचाव्यात आणि त्यांच्या प्रश्नांवर न्याय्य तोडगा निघावा, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या महाअभिषेकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांनी मार्कंडादेव येथे येऊन शेतकऱ्यांची भूमिका प्रत्यक्ष ऐकावी आणि जमीन अधिग्रहणाबाबत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, यासाठी त्यांना निमंत्रण देण्यात येणार असल्याचे ब्राह्मणवाडे यांनी सांगितले.
शेतकरी एकजुटीचे शक्तिप्रदर्शन :-

या महाअभिषेकाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष जमीन अधिग्रहणाच्या प्रश्नाकडे वेधण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. हा प्रश्न केवळ काही गावांचा नसून, शेतकऱ्यांच्या भवितव्याशी संबंधित असल्याने जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांनी एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
“जमीन आमची, हक्क आमचा; निर्णयही शेतकऱ्यांच्या संमतीनेच झाला पाहिजे,” असा सूर यावेळी उमटला. त्यामुळे ७ सप्टेंबर रोजी मार्कंडादेव येथे होणाऱ्या महाअभिषेकाकडे शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

या पत्रकार परिषदेला काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोद भगत, नगरसेवक सुमेध तुरे, सोशल मीडिया प्रमुख विजय लाड, काँग्रेस चामोर्शी शहराध्यक्ष विलास चिचघरे, अमर मोगरे, संजय बुरांडे, लीलाधर सुरजागडे, दिवाकर निसार, गुरुदास ठुसे, नरेंद्र कोठारे, मुखरू शेंडे, वसंत बुरमवार, तात्याजी चिचघरे, नदीम नाथानी, सुनील कोहपरे, नेताजी गावतुरे, नुमचंद भिवणकर, अभिषेक रोहनकर, नीलकंठ हजारे यांच्यासह विविध पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
