VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गांधीनगर, सावंगी, आमगावात ग्रामस्थांशी संवाद; ३१ ऑगस्टच्या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन,
गडचिरोली/देसाईगंज , ३० ऑगस्ट २०२६ ::-देसाईगंज येथे ३१ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर गावोगावी जनजागृतीला जोर आला आहे. महामोर्चाच्या प्रचार व प्रसारासाठी आमदार रामदासजी मसराम यांनी गांधीनगर, सावंगी आणि आमगाव येथे प्रत्यक्ष भेटी देत ग्रामस्थांशी संवाद साधला.

या भेटीदरम्यान आ. मसराम यांनी शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, आदिवासी, निराधार तसेच महागाईने त्रस्त नागरिकांच्या विविध प्रश्नांवर ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली. जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी आयोजित करण्यात आलेला हा महामोर्चा व्यापक आणि निर्णायक करण्यासाठी गावागावातून नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

“हा महामोर्चा केवळ एका घटकाचा नसून सर्वसामान्य जनतेच्या हक्कांचा आवाज बुलंद करणारा लढा आहे. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी प्रत्येक गावातून नागरिकांनी मोठ्या संख्येने देसाईगंज येथे उपस्थित राहावे,” असे आवाहन आ. रामदास मसराम यांनी ग्रामस्थांना केले.

दरम्यान, आ. मसराम यांच्या गावभेटींमुळे महामोर्चाच्या तयारीला अधिक वेग आला असून, ग्रामस्थांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध गावांमधून मोठ्या संख्येने नागरिक महामोर्चात सहभागी होण्याची तयारी करत आहेत.

३१ ऑगस्ट रोजी देसाईगंज येथे होणाऱ्या या भव्य महामोर्चातून जनतेच्या प्रश्नांना कितपत व्यापक प्रतिसाद मिळतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
