VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
दुर्गंधी, अस्वच्छता अन् दुरवस्थेमुळे नागरिक त्रस्त; तलावाच्या विकासासाठी तातडीने निधी देण्याचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचे आश्वासन,
गडचिरोली /चामोर्शी, 31 ऑगस्ट 2026::-शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला ऐतिहासिक गाव तलाव सध्या जलपर्णी आणि टाकाऊ वनस्पतींच्या विळख्यात सापडला असून, तलावाच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तलावाची तातडीने स्वच्छता करून दुरुस्ती, सुशोभीकरण व सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी मागणी चामोर्शी शहरातील नागरिक व लोकप्रतिनिधींनी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
शहराच्या मध्यभागी असलेल्या या तलावाला धार्मिक तसेच ऐतिहासिक महत्त्व आहे. गौरी-गणपती तसेच देवीच्या मूर्तींचे विसर्जन याच तलावात केले जाते. मात्र, सध्या तलावात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढल्याने पाण्याचा परिसर झाकला गेला असून, दुर्गंधीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
तलावाचे सौंदर्यीकरण झाल्यास मिळणार नवे विरंगुळाकेंद्र :-
तलावाची योग्य पद्धतीने स्वच्छता करून परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आल्यास चामोर्शी शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे. तलावाभोवती सुशोभीकरण, स्वच्छ परिसर आणि नागरिकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण झाल्यास हे ठिकाण शहरवासीयांसाठी फिरण्यासाठी, विश्रांतीसाठी आणि विरंगुळ्यासाठी आकर्षक केंद्र ठरू शकते. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाकडे केवळ स्वच्छतेचा विषय म्हणून न पाहता शहराच्या विकासाचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून पाहावे, अशी मागणी नागरिकांनी केली.
आमदार नरोटेंकडून तातडीने काम मार्गी लावण्याचे आश्वासन :-
नागरिकांच्या मागणीची गंभीर दखल घेत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी तलावाच्या विकासकामाला तातडीने मंजुरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच आवश्यक निधी उपलब्ध करून देत तलावाची दुरुस्ती व सौंदर्यीकरणाचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यासोबतच चामोर्शी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.
निवेदनावेळी नागरिकांची मोठी उपस्थिती :-
निवेदन सादर करताना भाजप तालुकाध्यक्षा तथा महिला व बालकल्याण सभापती रोशनी वरघंटे, माजी संवर्ग विकास अधिकारी पी. जे. सातार, सोपान नैताम, सुभाष कर्णे, माणिकचंद कोहळे, रमेश नैताम, वासुदेव चिचघरे, रितेश पालारपवार, नीरज रामानुजमवार, बंडु नैताम, भारत धोडरे, कविता किरमे, अनिल बोदलकर यांच्यासह चामोर्शी शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते.
ऐतिहासिक गाव तलावाची दुरवस्था दूर होऊन त्याचे आकर्षक रूपडे पुन्हा खुलावे, अशी अपेक्षा आता चामोर्शीकरांकडून व्यक्त होत आहे.
