VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली /चामोर्शी,३१ ऑगस्ट २०२६::- सामाजिक बांधिलकी जपत अतुलभाऊ गण्यारपवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी चामोर्शी येथे मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून तालुक्यातील गरजू नागरिकांना नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना डोळ्यांच्या समस्यांकडे वेळेवर लक्ष देता यावे आणि मोतीबिंदूसारख्या आजाराचे निदान लवकर व्हावे, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
शिबिरामध्ये नागरिकांची मोतीबिंदूसह डोळ्यांची तपासणी करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे चामोर्शी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, महिला तसेच सर्व गरजू नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
“वाढदिवसानिमित्त नागरिकांच्या आरोग्यासाठी काहीतरी विधायक आणि उपयोगी करता यावे, या उद्देशाने मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. चामोर्शी तालुक्यातील सर्व जनतेने या शिबिराचा लाभ घ्यावा,” असे आवाहन अतुलभाऊ गण्यारपवार यांनी केले.
या सामाजिक उपक्रमामुळे गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्यसेवेचा दिलेला हा संदेश निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
