VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
चामोर्शी बसस्थानकावर अर्धा तास रास्ता रोको; पोलीस निरीक्षक ढाकणे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना बस उपलब्ध करून दिली,
गडचिरोली /चामोर्शी, 01 ऑगस्ट 2026::- गणपूर-जयरामपूर मार्गावरील एसटी बससेवा अनियमित असल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी १ सप्टेंबर रोजी चामोर्शी बसस्थानकावर रास्ता रोको आंदोलन केले. बस निर्धारित वेळेत उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. या समस्येच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी सुमारे अर्धा तास बस रोखून धरत प्रशासनाचे लक्ष वेधले.
गणपूर, जयरामपूर व परिसरातील विद्यार्थी दररोज सकाळी लवकर शाळेत येतात. सकाळी ६ वाजताच शाळेत पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी साडेबारा वाजताची बस अपेक्षित असते. मात्र, ही बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांना बसस्थानकावर ताटकळत थांबावे लागत असल्याची तक्रार आहे. त्याचबरोबर दुपारी दोन वाजताची बसदेखील वेळेत सोडली जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती.

“सकाळी उपाशीपोटी ६ वाजता शाळेत येतो; मात्र घरी जाण्यासाठी बस वेळेवर मिळत नाही. बस वेळेवर येत नाही, विद्यार्थ्यांना घेतले जात नाही, मग आम्ही काय करायचे?” असा सवाल संतप्त विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी चामोर्शी बसस्थानकावर रास्ता रोको आंदोलन केल्याची माहिती चामोर्शी पोलीस निरीक्षक ढाकणे यांना मिळताच त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अधिकारी व कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने समन्वय साधत विद्यार्थ्यांसाठी बस उपलब्ध करून दिली. बस उपलब्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे समाधान झाले आणि आंदोलनाची सांगता करण्यात आली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एसटी बस ही शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची वाहतूक व्यवस्था आहे. त्यामुळे गणपूर-जयरामपूर मार्गावरील बसफेऱ्या निर्धारित वेळेनुसार आणि नियमितपणे सुरू ठेवाव्यात, तसेच विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.
या संपूर्ण प्रकारात चामोर्शी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणत विद्यार्थ्यांना बस उपलब्ध करून दिल्याने आंदोलन शांततेत संपले. पोलिसांच्या तत्परतेमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, आता एसटी प्रशासनाकडून या मार्गावरील बससेवा नियमित करण्याची अपेक्षा विद्यार्थी व पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
