VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
शहीद कुटुंबीय संवाद बैठकीत समस्या जाणून घेत तातडीने निराकरणाचे आश्वासन,
गडचिरोली | दि. २ सप्टेंबर २०२६ ::- गडचिरोली जिल्ह्यात माओवादविरोधी अभियानादरम्यान कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या समस्या, अडचणी व गरजा जाणून घेण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने शहीद कुटुंबीय संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले. पोलीस मुख्यालयातील एकलव्य सभागृहात झालेल्या या बैठकीत शहीद कुटुंबीयांशी आत्मीयतेने संवाद साधत त्यांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

गडचिरोली जिल्ह्यात माओवादविरोधी अभियानात आतापर्यंत सुरक्षा दलातील २१४ जवानांनी वीरमरण पत्करले आहे. त्यांच्या शौर्य, त्याग आणि बलिदानामुळे जिल्ह्यात शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना मोठे बळ मिळाले आहे. या शूर जवानांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याच्या उद्देशाने या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले.
पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या बैठकीस अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. उपस्थित होते. त्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या कौटुंबिक, शैक्षणिक, आर्थिक तसेच शासकीय योजनांशी संबंधित समस्या जाणून घेतल्या.
कुटुंबीयांनी मांडलेल्या विविध मागण्या व अडचणींची यावेळी नोंद घेण्यात आली. संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कुटुंबीयांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करत त्यांच्या अडचणींचे शक्य तितक्या लवकर निराकरण करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले.

“शहीद जवानांच्या कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये, यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहील,” असा विश्वास अपर पोलीस अधीक्षक श्री. गोकुल राज जी. यांनी व्यक्त केला.
शहीद जवानांनी देशसेवेसाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची जाणीव ठेवून त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. या संवाद बैठकीमुळे शहीद कुटुंबीय आणि पोलीस दलातील ऋणानुबंध अधिक दृढ होण्यास मदत झाली.
बैठकीस अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., संबंधित मंत्रालयीन कर्मचारी तसेच शहीद जवानांच्या कुटुंबीयांचे सदस्य उपस्थित होते.
