VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली, 08 सप्टेंबर 2026::- गोंडवाना विद्यापीठाच्या एकल उपक्रमाचे समन्वयक म्हणून आत्मसमर्पित माजी नक्षलवादी मल्लोजुलू वेणुगोपाल राव ऊर्फ भूपती यांची करण्यात आलेली नियुक्ती रद्द करू नये, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांनी केली आहे. काही संघटनांकडून नियुक्तीला होत असलेला विरोध हा द्वेषभावनेतून असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
यासंदर्भात भाई रामदास जराते यांनी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू यांना पत्र पाठविले आहे. नक्षल चळवळीमुळे पोलीस जवान, निरपराध नागरिक तसेच आदिवासी समाजातील अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. सशस्त्र संघर्ष हा देशाच्या भविष्यासाठी धोकादायक राहिला आहे. मात्र, नक्षल चळवळीतील अनेकांनी शस्त्रांचा त्याग करून लोकशाहीचा मार्ग स्वीकारला असून, शासनाच्या आत्मसमर्पण धोरणामुळे ही प्रक्रिया शक्य झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गडचिरोलीत आत्मसमर्पण केलेल्या नक्षल कार्यकर्त्यांना सन्मानाने पुनर्वसनाचे आश्वासन शासनाने दिले होते. त्या पार्श्वभूमीवर भूपती यांना गोंडवाना विद्यापीठाच्या उपक्रमाचे समन्वयक म्हणून काम करण्याची संधी देणे हे आत्मसमर्पण धोरणाची अंमलबजावणी करणारे महत्त्वाचे उदाहरण असल्याचे जराते यांनी नमूद केले आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक दबावामुळे ही नियुक्ती रद्द करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भूपती यांच्या नियुक्तीला विरोध करणाऱ्यांबाबतही जराते यांनी गंभीर आरोप केले आहेत. नक्षल चळवळीच्या काळात त्यांच्याशी जवळीक असल्याचे सांगून काहींनी आपले राजकीय व आर्थिक हितसंबंध साधले, असा दावा त्यांनी केला. नक्षल चळवळ संपुष्टात आल्याने काहींचे कथित हितसंबंध बाधित होत असल्यामुळे नियुक्तीला विरोध केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

जल, जंगल आणि जमीन, ग्रामसभा, पेसा तसेच वनाधिकार कायद्याच्या संदर्भात गोंडवाना विद्यापीठाच्या उपक्रमासाठी भूपती यांचा अनुभव उपयुक्त ठरू शकतो, असेही जराते यांनी म्हटले आहे. गेल्या अनेक दशकांपासून मध्य भारतातील आदिवासी समाज, त्यांची संस्कृती आणि नैसर्गिक संसाधनांशी संबंधित प्रश्नांचा अभ्यास केलेल्या व्यक्तीला विद्यापीठाने संधी दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
भूपती यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोलीतील नव्या पिढीला जल, जंगल, जमीन आणि नैसर्गिक संसाधनांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्याची संधी मिळू शकते, असा आशावाद व्यक्त करत, शासनाने कोणत्याही राजकीय अथवा सामाजिक दबावाला बळी न पडता त्यांची नियुक्ती कायम ठेवावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाई रामदास जराते यांनी केली आहे.
