VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत मूल्यसंस्कारांवर भर; जीर्ण शाळा इमारतींचे तातडीने निर्लेखन करण्याचे निर्देश,
गडचिरोली, 10 सप्टेंबर 2026::-गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासीबहुल जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत सुरक्षित व सक्षम शैक्षणिक वातावरण मिळावे, यासाठी शासन कटिबद्ध आहे. शाळांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत शिक्षणमंत्री भुसे यांनी गुरुवारी जिल्ह्यातील विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी देत शैक्षणिक गुणवत्ता, उपलब्ध सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या अडचणींचा आढावा घेतला. त्यानंतर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षकांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर जिल्हाधिकारी संजय आसवले, शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रेरक उजगारे यांच्यासह अधिकारी, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
शाळा म्हणजे ज्ञानमंदिर; लोकसहभागातून विकास करा :-

शाळा ही विद्यार्थ्यांच्या भवितव्याची पायाभरणी करणारे ज्ञानमंदिर आहे. गावातील मंदिराच्या विकासासाठी ज्याप्रमाणे ग्रामस्थ एकत्र येतात, त्याचप्रमाणे शाळांच्या विकासासाठी माजी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी लोकसहभागातून पुढाकार घ्यावा, असे आवाहन भुसे यांनी केले.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, शिस्त आणि उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे ही काळाची गरज आहे. गडचिरोलीच्या दुर्गम भागात प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षक निष्ठेने ज्ञानदानाचे कार्य करत असून त्यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हा परिषद शाळांचे चित्र सकारात्मकरीत्या बदलत असल्याचे त्यांनी नमूद केले.
जीर्ण शाळा इमारतींचे तातडीने निर्लेखन :-

शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, पुरेशा वर्गखोल्या, क्रीडांगण, ई-लॅब आणि वाचनालय यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. जीर्ण, निरुपयोगी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या जुन्या इमारतींचे तातडीने निर्लेखन करून नवीन इमारतींसाठी प्रस्ताव व आराखडे सादर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
शाळांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समिती, सीएसआर आणि मानव विकास मिशनच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती; केंद्रप्रमुखांच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी :-

राज्यात ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीने शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असून रिक्त पदांवर लवकरच शिक्षक रुजू होतील. त्यामुळे शिक्षकांची कमतरता दूर होण्यास मदत होईल. तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला केंद्रप्रमुखांच्या पदोन्नतीचा प्रश्नही मार्गी लावण्यात आल्याची माहिती भुसे यांनी दिली.
मुलींच्या सुरक्षिततेसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण तसेच विद्यार्थ्यांना प्राथमिक सैनिकी प्रशिक्षण देण्यावरही शासनाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद :-

अभियानांतर्गत शिक्षणमंत्र्यांनी रामनगर येथील पीएम श्री जवाहरलाल नेहरू नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा, आरमोरी रोडवरील प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल, श्रीमती सिंधुताई पोरेड्डीवार हायस्कूल गोगाव, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोगाव आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आयएसओ आदर्श शाळा बोदली येथे भेटी दिल्या.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून शाळेत दिले जाणारे शिक्षण, शिक्षकांची अध्यापन पद्धती, उपलब्ध सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.
रामनगर शाळेत विद्यार्थ्यांचे वाचन व कविता गायन ऐकून त्यांनी कौतुक केले. गोगाव शाळेत वृक्षारोपण करून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधांची पाहणी केली. तर बोदली येथील आदर्श शाळेत विद्यार्थ्यांसोबत पोळा सणाचा आनंद घेतला. डिजिटल वर्ग व संगणक लॅबची पाहणी करून नादुरुस्त पॅनेल्स तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
गुणवंत विद्यार्थी, उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान :-

सामाजिक न्याय भवनातील कार्यक्रमात राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच उपक्रमशील शिक्षकांचा शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
इस्रोच्या शैक्षणिक सहलीचा अनुभव सांगणाऱ्या मोहुर्ली मॉडेल स्कूलच्या सन्ना शकील पठाण, ‘इन्स्पायर अवॉर्ड’मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा देसाईगंज येथील ध्रुव विनोद कोवे, राज्य विज्ञान मेळाव्यात द्वितीय क्रमांक मिळविणारा येनापूरचा नमन पेदापल्लीवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यासोबतच राष्ट्रीय स्तरावरील सॉफ्टबॉल, कबड्डी, खो-खो, कराटे तसेच स्काऊट-गाईडमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. एनएमएमएस, नवोदय आणि विविध शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आले.
प्रयोगशील व तंत्रस्नेही शिक्षक दिलीप नाकाडे, प्रवीण दोर्लीकर यांच्यासह जिल्ह्यातील ‘आयडॉल शिक्षकां’चा शाल व गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, सुरक्षित शाळा आणि आवश्यक सुविधा देण्यास शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या दौऱ्यातून स्पष्ट झाले.
