VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली /अहेरी, 08 सप्टेंबर 2026::-(छल्लेवाडा) अहेरी तालुक्यातील गोलाकर्जी–रेपनपल्ली मुख्य मार्गाच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेसच्या वतीने पुकारण्यात आलेल्या धान रोवणी व रस्ता रोको आंदोलनाला अखेर यश आले आहे. आंदोलनाची दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत उद्यापासून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे लेखी आश्वासन दिले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी १० वाजता छल्लेवाडा-कमलापूर मार्गावरील खड्ड्यातच अनोख्या पद्धतीने धान रोवणी आंदोलन करण्यात आले. यावेळी आजी-माजी ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोलाकर्जी–रेपनपल्ली मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने काँग्रेसने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी उद्यापासून तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले.
याशिवाय गोलाकर्जी ते राजारामपर्यंत सिमेंट रस्ता, राजाराम ते कमलापूर नवीन डांबरीकरण तसेच रेपनपल्ली ते कमलापूर सिमेंट रस्त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात येईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. मात्र, “जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासनाला आम्ही जागे केले आहे. उद्यापासून प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, लेखी आश्वासनामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी प्रशासन प्रत्यक्षात कितपत तत्परतेने काम सुरू करते, याकडे आता परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
