Saturday, September 12, 2026
HomeChamorshiCEIRच्या मदतीने चामोर्शी पोलिसांची दमदार कामगिरी; ७ चोरीचे मोबाईल मूळ मालकांच्या स्वाधीन...

CEIRच्या मदतीने चामोर्शी पोलिसांची दमदार कामगिरी; ७ चोरीचे मोबाईल मूळ मालकांच्या स्वाधीन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

२ लाख ४० हजार रुपये किमतीचे मोबाईल परत; तांत्रिक तपासातून पोलिसांना यश,

गडचिरोली /चामोर्शी, 08 सप्टेंबर 2026::-शहर व परिसरातून चोरीस गेलेल्या तसेच हरवलेल्या महागड्या मोबाईलचा शोध घेण्यात चामोर्शी पोलिसांना मोठे यश आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या माध्यमातून तब्बल ७ मोबाईल हस्तगत करून ते त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे २ लाख ४० हजार रुपये आहे. मंगळवारी, ८ सप्टेंबर रोजी चामोर्शी पोलीस ठाण्यात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात हे मोबाईल तक्रारदारांच्या स्वाधीन करण्यात आले.

गेल्या दोन-तीन महिन्यांत चामोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवासादरम्यान, बाजारपेठेत तसेच शेतात काम करताना नागरिकांचे मोबाईल चोरीला जाणे अथवा हरवण्याच्या घटना घडल्या होत्या. याबाबत नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या.

या तक्रारींची गंभीर दखल घेत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. गडचिरोली उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे व पोलीस उपनिरीक्षक ललिता सातव यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.

या पथकात पोलीस अंमलदार भावेश वरगंटीवार व धनंजय मेश्राम यांचा समावेश होता. पथकाने चोरीस गेलेल्या व हरवलेल्या मोबाईलचे IMEI क्रमांक CEIR पोर्टलवर नोंदवून तांत्रिक पद्धतीने त्यांचा माग काढला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे विविध ठिकाणी वापरात असलेले १५ मोबाईल शोधून काढण्यात पथकाला यश आले. त्यापैकी आवश्यक पडताळणी पूर्ण करून ७ तक्रारदारांचे मोबाईल आज त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले.

चामोर्शी पोलीस ठाण्यात झालेल्या कार्यक्रमात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत तक्रारदारांना त्यांचे मोबाईल सुपूर्द करण्यात आले. अनेक दिवसांनंतर हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसून आला. नागरिकांनी चामोर्शी पोलिसांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत आभार मानले.

मोबाईल हरवल्यास CEIRचा वापर करा :-

मोबाईल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास नागरिकांनी विलंब न करता जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी तसेच CEIR पोर्टलवर मोबाईलचा IMEI क्रमांक नोंदवावा, असे आवाहन चामोर्शी पोलिसांनी केले आहे. CEIRच्या माध्यमातून चोरीस गेलेल्या किंवा हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यास पोलिसांना मोठी मदत होत आहे.

चोरीस गेलेल्या मोबाईलचा तांत्रिक तपास करून ते पुन्हा मूळ मालकांच्या स्वाधीन करण्याची चामोर्शी पोलिसांची ही कामगिरी कौतुकास्पद ठरत असून नागरिकांकडून पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular