Friday, September 11, 2026
HomeGadchiroliकमी पाऊसमानात धान पिकाचे व्यवस्थापन...

कमी पाऊसमानात धान पिकाचे व्यवस्थापन…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, 09 सप्टेंबर 2026::- जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये यासाठी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण, खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

कमी पावसाच्या काळात शेतातील उपलब्ध पाणी टिकवून ठेवण्यासाठी बांध-बंदिस्ती मजबूत करावी. विशेषतः फुटवे अवस्था, लोंबी येण्याची अवस्था, फुलोरा आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडणार नाही, याची दक्षता घ्यावी. तण नियंत्रण वेळेवर करावे तसेच जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करूनच खत व्यवस्थापन करावे. कोरड्या जमिनीत मोठ्या प्रमाणात युरिया देणे टाळावे. 

धान पिकाची नियमित पाहणी करून खोडकिडा, गादमाशी, कडा करपा आणि पर्णकोष करपा यांसारख्या कीड-रोगांच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवावे. प्रादुर्भाव आढळल्यास कृषी विभागाच्या शिफारशीनुसार आवश्यक उपाययोजना कराव्यात. विनाकारण फवारणी न करता प्रादुर्भावाची तीव्रता पाहूनच कीड-रोग नियंत्रण करावे. 

शेतकऱ्यांनी तण वाढू देणे, विनाकारण फवारणी करणे तसेच एकाच वेळी अनेक खते किंवा औषधांचे अनावश्यक टँकमिश्रण करणे टाळावे. पिकाची नियमित पाहणी करून परिस्थितीनुसार योग्य व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. किशोर झाडे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular