VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली, दि. ८ सप्टेंबर : अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मौजा येलचिल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. पोलीस रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या शिबिरात २६१ नागरिकांची तज्ज्ञ वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात विविध आजारांची तपासणी करून गरजेनुसार नागरिकांना मोफत औषधोपचार देण्यात आले. तसेच विविध आजार, पोषण समस्या आणि आरोग्यविषयक बाबींवर नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. तपासणीनंतर १७ नागरिकांना पुढील उपचार व तपासणीसाठी विविध रुग्णालयांकडे संदर्भित करण्यात आले.

शिबिरात पोलीस रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. रोशन गिरसावळे, डॉ. श्रेया कुमरे, औषधी निर्माण अधिकारी राकेश गराडे आणि अधिपरिचारिका संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथकाने सेवा बजावली.
आरोग्यसेवेसोबत शहीद जवानांच्या शौर्याचीही जनजागृती :-
या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे फिरत्या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये शहीद जवानांचे बलिदान, सी-६० जवानांचे शौर्य आणि पोलीस दलाच्या नागरी कृती उपक्रमांची माहिती देण्यात आली. विविध बॅनर व माहितीफलकांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने २०२१ पासून आतापर्यंत २०७ आरोग्य मेळावे घेऊन ४३ हजारांहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून ४,८६४ युनिट रक्ताचे संकलन करण्यात आले आहे. ‘ऑपरेशन रोशनी’ अंतर्गत ९,९७१ हून अधिक नागरिकांची नेत्र तपासणी, तर १,४१२ नागरिकांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नियोजन :-

या आरोग्य शिबिराचे आयोजन पोलीस अधीक्षक एम. रमेश, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी, अपर पोलीस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी. जे. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
पोमकें येलचिलचे पोलीस उपनिरीक्षक धनाजी शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक बंगर तसेच पोलीस अंमलदारांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
