Friday, September 11, 2026
HomeGadchiroliदिल्लीच्या राष्ट्रीय मंचावर गडचिरोलीच्या ‘रेला’ची दिमाखदार छाप...

दिल्लीच्या राष्ट्रीय मंचावर गडचिरोलीच्या ‘रेला’ची दिमाखदार छाप…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

नॉर्थ-ईस्ट स्टुडंट फेस्टिव्हलमध्ये आदिवासी संस्कृतीचे प्रभावी सादरीकरण; सहभागी युवक-युवती व आत्मसमर्पित माओवाद्यांचा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या हस्ते गौरव,

 गडचिरोली, 09 सप्टेंबर 2026::- गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील युवक-युवती तसेच आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच उपक्रमाचा भाग असलेल्या ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत दिल्ली येथे आयोजित ९व्या नॉर्थ-ईस्ट स्टुडंट फेस्टिव्हलमध्ये गडचिरोलीच्या युवक-युवतींनी आपल्या पारंपरिक ‘रेला’ नृत्याद्वारे जिल्ह्याच्या समृद्ध आदिवासी संस्कृतीची राष्ट्रीय पातळीवर दिमाखदार ओळख निर्माण केली.

दिल्ली येथे ४ व ५ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या या महोत्सवात गडचिरोली जिल्ह्यातील ४ आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसह अनुप डान्स ग्रुपमधील १४ युवक-युवती, असे एकूण १८ जण सहभागी झाले होते. यावेळी पारंपरिक वाद्यांच्या साथीने सादर करण्यात आलेल्या ‘रेला’ नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.

या सादरीकरणातून गडचिरोलीची वैशिष्ट्यपूर्ण आदिवासी संस्कृती, पारंपरिक कला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा राष्ट्रीय स्तरावरील मंचावर प्रभावीपणे पोहोचविण्यात आला. त्याचबरोबर नृत्याच्या माध्यमातून शांतता, एकता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेशही देण्यात आला.

राष्ट्रीय स्तरावरील महोत्सवात गडचिरोलीचे प्रतिनिधित्व करून परतलेल्या सहभागी युवक-युवती व आत्मसमर्पित माओवादी सदस्यांचा ८ सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. उत्कृष्ट सहभागाबद्दल सहभागी सदस्यांना रोख बक्षिसेही प्रदान करण्यात आली.

यावेळी पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी सहभागींचे अभिनंदन करताना सांगितले की, माओवादविरोधातील प्रदीर्घ संघर्षानंतर गडचिरोली जिल्हा शांतता आणि विकासाच्या दिशेने पुढे जात आहे. अशा पार्श्वभूमीवर दिल्लीसारख्या राष्ट्रीय मंचावर गडचिरोलीच्या समृद्ध आदिवासी संस्कृतीचे आणि पारंपरिक नृत्यकलेचे प्रतिनिधित्व करण्याची मिळालेली संधी अत्यंत महत्त्वाची आहे.

“आपण सादर केलेले रेला नृत्य हे केवळ सांस्कृतिक सादरीकरण नव्हते, तर गडचिरोलीच्या परिवर्तनाची, शांततेची आणि नव्या आशेची प्रभावी ओळख होती. आपल्या उत्कृष्ट सादरीकरणातून गडचिरोलीसह महाराष्ट्राचे नाव देशपातळीवर उज्ज्वल झाले,” असे गौरवोद्गार पोलीस अधीक्षकांनी काढले.

दरम्यान, आत्मसमर्पित माओवादी सदस्यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना अतिदुर्गम गडचिरोलीतून थेट देशाच्या राजधानीत राष्ट्रीय स्तरावरील मंचावर आदिवासींचे पारंपरिक ‘रेला’ नृत्य सादर करण्याची संधी मिळाल्याबद्दल गडचिरोली पोलीस दलाचे आभार मानले.

माओवादाच्या सावटातून शांतता, संस्कृती आणि नव्या संधींकडे वाटचाल करणाऱ्या गडचिरोलीची ही सांस्कृतिक झेप जिल्ह्याच्या बदलत्या चित्राची प्रेरणादायी कहाणी ठरली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular