VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
एमआयडीसीसाठी शेतजमीन घेण्याऐवजी झुडपी जंगल अथवा पडीक जमिनीचा वापर करा : प्रणय खुणे,
गडचिरोली /चामोर्शी, 10 सप्टेंबर 2026::- चामोर्शी तालुक्यातील येनापूर-जयरामपूर परिसरातील १३ गावांमध्ये प्रस्तावित एमआयडीसीसाठी होणाऱ्या भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र विरोधाची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (८ सप्टेंबर) चित्तरंजनपूर (येनापूर) येथे सर्वपक्षीय सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला शेकडो शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या लढ्याला पाठिंबा जाहीर केला. येनापूर-जयरामपूर परिसरातील १३ गावांतील सुपीक शेतजमिनी एमआयडीसीसाठी कोणत्याही परिस्थितीत संपादित करू देणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली.
“उद्योग आणि विकासाला आमचा विरोध नाही; मात्र सुपीक शेती उद्ध्वस्त करून होणारा विकास आम्हाला मान्य नाही. शासनाने उद्योग प्रकल्पांसाठी पर्यायी, पडीक अथवा झुडपी जंगल क्षेत्राचा विचार करावा. शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या कसलेल्या जमिनी हिरावून घेण्याऐवजी शासनाने उपलब्ध पर्यायी जमिनीचा वापर करावा,” असे प्रणय खुणे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता असून कोणत्याही आमिषाला बळी न पडता सर्वांनी एकजूट कायम ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले. “सुपीक जमीन वाचविण्यासाठीचा हा लढा केवळ एका गावाचा नसून १३ गावांतील शेतकऱ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. त्यामुळे सर्व पक्ष आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन हा लढा अधिक तीव्र करावा,” असेही खुणे यांनी नमूद केले.
यावेळी प्रकाश पोहरे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश पदमशाली, जिल्हा महाग्रामसभेचे नितीन पदा, राहुल सोनटक्के, निखिल भारत बंगाली समाज संघटनेचे दीपक हलदार, शिवसेना पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख हेमंत जंबेवार, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अमोल गण्यारपवार, काँग्रेसचे मनोहर पाटील पोरेटी, पंकज गुड्डेवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख पवन गेडाम, मनसे जिल्हाप्रमुख राजेंद्र साळवे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. महेश कोपुलवार, महेश मारकवार, आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बनसोड, बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष रमेश मडावी, सीटूचे सचिव देवराव चवळे, नाना पसपुलवार आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेदरम्यान १३ गावांतील शेतजमिनींचे संभाव्य भूसंपादन, शेतकऱ्यांचे भवितव्य आणि पर्यायी जागेवर औद्योगिक प्रकल्प उभारण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सुपीक शेतजमिनी वाचविण्यासाठी पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
