Monday, September 21, 2026
HomeGadchiroliसहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी सभासदांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा – इंजि. प्रमोद पिपरे...

सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी सभासदांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा – इंजि. प्रमोद पिपरे…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

श्री संताजी नागरी सहकारी पतसंस्थेची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; देणगीदार व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रतिनिधींचा गौरव,

गडचिरोली, 20 सप्टेंबर 2026::- सहकारी संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पतसंस्थांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. सभासदांचा विश्वास, आर्थिक शिस्त आणि पारदर्शक कारभाराच्या बळावर सहकार क्षेत्राचा विकास साधता येतो. त्यामुळे सभासदांनी संस्थेच्या प्रगतीसाठी सक्रिय सहभाग घ्यावा, तसेच सहकार क्षेत्राच्या माध्यमातून उद्योग सहकारी संस्था उभारून नवउद्योजक घडवावेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या., पुणेचे संचालक तथा गडचिरोली नगरपरिषदेचे माजी सभापती इंजि. प्रमोदजी पिपरे यांनी केले.

श्री संताजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., गडचिरोलीची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा २०२५-२०२६ रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता श्री संताजी स्मृती प्रतिष्ठान, आरमोरी रोड, गडचिरोली येथे उत्साहात संपन्न झाली. या सभेचे उद्घाटक म्हणून इंजि. प्रमोदजी पिपरे उपस्थित होते. यावेळी सभासदांना मार्गदर्शन करताना त्यांनी सहकार क्षेत्राचे महत्त्व, संस्थेच्या प्रगतीतील सभासदांची भूमिका आणि आर्थिक व्यवहारांमधील शिस्त व पारदर्शकतेचे महत्त्व अधोरेखित केले.

संताजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात :-

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोलीच्या नगराध्यक्षा सौ. प्रणोतीताई निंबोरकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून श्री संताजी प्रतिष्ठान, गडचिरोलीचे सचिव श्री. सुरेशजी भांडेकर, श्री संताजी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. भय्याजी सोमणकर, उपाध्यक्ष श्री. राजेंद्र भुरसे, संचालक श्री. विजय भांडेकर, संचालक श्री. गजानन बारसागडे, प्रवर्तक श्री. रघुनाथजी भांडेकर, श्री. रमेश बोधलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

याशिवाय संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळाचे सदस्य, सभासद आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांचा व गुणवंतांचा सन्मान :-

सभेदरम्यान श्री संताजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने उद्घाटक इंजि. प्रमोदजी पिपरे यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच पतसंस्थेला आर्थिक देणगी देऊन सहकार्य करणाऱ्या देणगीदारांचा आणि संस्थेमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रतिनिधींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व श्री संताजी महाराजांचे स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या सत्कार सोहळ्यामुळे संस्थेच्या कार्यात योगदान देणाऱ्यांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सभासदांच्या सहभागातून संस्थेच्या प्रगतीचा संकल्प :-

सहकार क्षेत्रात सभासदांचा विश्वास आणि सहभाग महत्त्वाचा असून, संस्थेच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. आर्थिक शिस्त, पारदर्शक व्यवहार आणि सहकार्याच्या भावनेतून पतसंस्थेने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी, असा संदेश या सभेच्या माध्यमातून देण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालिका सौ. शिलाताई सोमणकर यांनी केले, तर उपाध्यक्ष श्री. राजेंद्रजी भुरसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

श्री संताजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या या दुसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेला पदाधिकारी, संचालक, सभासद आणि कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular