VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोलीत भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन,
गडचिरोली, 22 सप्टेंबर 2026 ::-विद्यार्थ्यांमधील वक्तृत्वकला, वैचारिक क्षमता आणि आत्मविश्वासाला चालना देण्याच्या उद्देशाने ‘कर्तव्य कक्ष गणेशोत्सव’च्या वतीने भव्य वक्तृत्व स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी पोटेगाव बायपास रोड, गडचिरोली येथील आ. डॉ. मिलिंद सगुणाबाई रामजी नरोटे यांच्या कर्तव्य कक्ष कार्यालयात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI हे तंत्रज्ञान आजच्या काळातील महत्त्वाचा विषय बनला असून, त्याचा शिक्षण, रोजगार, शेती, आरोग्य, उद्योग तसेच ग्रामीण विकासावर मोठा परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना AI विषयावरील आपले विचार, कल्पना आणि दृष्टिकोन प्रभावीपणे मांडण्याची संधी या वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहे.
स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचे दोन गट करण्यात आले आहेत. गट क्रमांक १ मध्ये इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातील संधी व आव्हाने’ हा विषय देण्यात आला आहे. तर गट क्रमांक २ मध्ये इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ग्रामीण भारताच्या विकासात कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका’ हा विषय ठेवण्यात आला आहे.
दोन्ही गटांसाठी स्वतंत्र बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली असून, प्रथम क्रमांकासाठी ₹३,००१, द्वितीय क्रमांकासाठी ₹२,००१ आणि तृतीय क्रमांकासाठी ₹१,००१ असे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या बदलत्या युगाची ओळख व्हावी, त्यांच्यामध्ये चिकित्सक विचार करण्याची क्षमता निर्माण व्हावी तसेच आपल्या कल्पना आणि मतांना आत्मविश्वासाने व्यासपीठावर मांडण्याची संधी मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
गडचिरोली शहर व परिसरातील शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या वक्तृत्वकौशल्याला आणि विचारांना प्रभावी व्यासपीठ मिळवून द्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९९२२०४००१२ / ८२७५७८५९२३
