VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
प्रज्ञाशोध परीक्षेत देव गोंगलेचे सुयश,
गडचिरोली/अहेरी, 22 सप्टेंबर 2026::- मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दि. २५ एप्रिल २०२६ रोजी राणी दुर्गावती कन्या शाळेत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा (MTS) मध्ये राजाराम (खां) येथील भगवंतराव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळेतील इयत्ता ८ वीचा विद्यार्थी देव मधुकर गोंगले याने जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याच्या या यशामुळे आश्रमशाळेसह कुटुंबीय आणि ग्रामस्थांकडून त्याचे अभिनंदन होत आहे.
देव गोंगले हा सामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी असून त्याच्या यशामागे आई-वडिलांसह शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्याची आई लताबाई मधुकर गोंगले आणि वडील मधुकर गोंगले यांनी त्याला शिक्षणासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले. वडील मधुकर गोंगले हे राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आहेत.
देवच्या शैक्षणिक वाटचालीत प्राथमिक स्तरापासूनच गणित विषयाची आवड निर्माण झाली. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीत शिक्षण घेत असताना त्याचे वर्गशिक्षक रामदास उघाडे सर यांनी गणित विषयाचे भक्कम मार्गदर्शन केले. त्यानंतर जी. के. मडावी सर यांनीही गणित विषयात सातत्यपूर्ण मार्गदर्शन करून त्याला प्रोत्साहन दिले. गणित विषयात नेहमीच अव्वल कामगिरी करण्याची सवय देवने कायम ठेवली.
त्याच्या यशात इंदाराम येथील मामा इम्रानखान पठाण यांचेही विशेष योगदान आहे. अभ्यासाबाबत सातत्याने मार्गदर्शन करण्यासोबतच सुख-दुःखाच्या प्रसंगी त्यांनी देवला आधार व प्रोत्साहन दिले. तसेच फरीन इम्रानखान पठाण यांनीही त्याच्या अभ्यासाला सातत्याने प्रोत्साहन दिले. जिल्हा परिषद केंद्र शाळेतील सर्व शिक्षकांचेही देवने आपल्या यशाचे श्रेय दिले आहे.
यानंतर देवने भगवंतराव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळा, राजाराम (खां) येथे इयत्ता आठवीत प्रवेश घेतला. गणित हा त्याचा आवडता विषय असून शाळेतील गणित विषयाचे शिक्षक सुदर्शन वासाडे यांनी त्याला सातत्याने मार्गदर्शन केले. ते शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असून विद्यार्थ्यांना नियमित गृहपाठ देऊन त्यांच्याकडून सराव करून घेतात. देवनेही दिलेला गृहपाठ नियमितपणे आणि कर्तव्यभावनेने पूर्ण करत आपल्या अभ्यासातील सातत्य कायम ठेवले.
या संपूर्ण शैक्षणिक प्रवासात शाळेचे मुख्याध्यापक टी. सी. ओड्नलवार सर, शिक्षकवृंद तसेच आई-वडिलांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देवला लाभले. त्याच जोरावर त्याने महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळवत आपल्या शाळेचे आणि कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे.
देव गोंगलेच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक, ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत असून, त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत.
