VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
31 जुगाऱ्यांना ताब्यात घेत 1.34 कोटींचा मुद्देमाल जप्त; 6 आरोपींचा शोध सुरू,
गडचिरोली, 25 सप्टेंबर 2026::-गडचिरोली जिल्ह्यात अवैध व्यवसाय आणि जुगारावर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईला मोठे यश मिळाले आहे. कोरची तालुक्यातील पोलीस मदत केंद्र बेडगावच्या पथकाने आंतरराज्य सीमेलगत असलेल्या गहाणेगाठा जंगल परिसरात सुरू असलेल्या कथित जुगार अड्ड्यावर धाड टाकून 31 आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत 22 चारचाकी वाहने, 6 दुचाकी, 26 मोबाईल फोन आणि 75 हजार 10 रुपये रोख, तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण 1 कोटी 34 लाख 14 हजार 10 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 सप्टेंबर रोजी रात्री पोलीस मदत केंद्र बेडगावच्या हद्दीतील गहाणेगाठा जंगल परिसरात काही इसम ताशाच्या पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनेश खोटेले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक दोन पंचांसह घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी जंगल परिसरात छापा टाकला असता काही इसम 52 ताशांच्या पत्त्यांच्या सहाय्याने पैशांची बाजी लावून जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच काही जणांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कारवाई करत घटनास्थळी उपस्थित असलेल्या आरोपींना ताब्यात घेतले.
या कारवाईत शैलेंद्र कुमार साहू (वय 26, रा. बेलारगोंदी, ता. छुरीया, जि. राजनांदगाव, छत्तीसगड), मोहम्मद बसीर (वय 48, रा. वार्ड क्र. 12, राजनांदगाव) यांच्यासह एकूण 31 जणांना ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता, त्यांनी छत्रपती बांगरे (रा. कोरची), अमजतखॉ पठाण, तालीब (रा. डोंगरगड), राजा ब्राँड ऊर्फ राजा श्रीवास (रा. राजनांदगाव) आणि हेमंत राजपूत (रा. राजनांदगाव) यांच्या सांगण्यावरून जुगार खेळण्यासाठी आल्याचे पोलिसांना सांगितल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात काही आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याचेही पोलिसांनी सांगितले.
37 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल :-
या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले तसेच घटनास्थळावरून पसार झालेले अशा एकूण 37 आरोपींविरुद्ध कोरची पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 0133/2026 अन्वये महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील सोनू कांबळे (रा. दुर्ग), इम्रान शेख (रा. डोंगरगाव), बबलू खाटीक (रा. भिलाई), रोहित साहू (रा. राजनांदगाव), बसंत सोनी (रा. दुर्ग) आणि अबुल वर्मा (रा. राजनांदगाव) या सहा आरोपींचा शोध सुरू आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई :-
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश खोटेले करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे आणि कोरची पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस मदत केंद्र बेडगावचे पोलीस उपनिरीक्षक दिनेश खोटेले यांच्यासह पोलीस अंमलदार विकास शेंडे, अनिल मडावी, सचिन येलमुलवार, मिथुन रासेकर आणि उमेशकुमार बन्सोड यांनी सहभाग घेतला.
