Saturday, September 26, 2026
HomeChamorshiअपूर्ण पुलियांचा धोका ऐरणीवर; चामोर्शीत नाल्यात पडली म्हैस...

अपूर्ण पुलियांचा धोका ऐरणीवर; चामोर्शीत नाल्यात पडली म्हैस…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

यशोधरा विद्यालयासमोरील घटना; जेसीबीच्या मदतीने म्हशीला सुरक्षित बाहेर काढले,

गडचिरोली /चामोर्शी, 26 सप्टेंबर 2026::-नवीन बसस्थानक परिसरात सुमारे दीड वर्षापूर्वी करण्यात आलेल्या रस्ते व पुलिया बांधकामातील काही कामे अद्याप अपूर्ण असल्याने त्याचा धोका आता जनावरांना बसू लागला आहे. पुलियांच्या नाल्यावरील भागाचे पॅकिंग पूर्ण न झाल्यामुळे उघडे भाग धोकादायक ठरत असून, शुक्रवारी सकाळी यशोधरा विद्यालयासमोर एक म्हैस नाल्यात पडल्याची घटना घडली.

शुक्रवारी सकाळी सुमारे १०.३० वाजता देवराव नैताम यांच्या मालकीची म्हैस यशोधरा विद्यालयासमोरील उघड्या नाल्यात पडली. नाल्यात पडलेल्या म्हशीला स्वतःहून बाहेर पडण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. अखेर जेसीबीच्या सहाय्याने प्रयत्न करून म्हशीला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

या घटनेमुळे नवीन बसस्थानक परिसरातील अपूर्ण पुलिया आणि उघड्या नाल्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुलियांचे काम पूर्ण झाले असले तरी काही ठिकाणी नाल्यांवरील पाट्यांचे पॅकिंग न झाल्याने जनावरे तसेच पादचाऱ्यांसाठीही धोका निर्माण झाला आहे. सध्या म्हैस नाल्यात पडून बचावली असली तरी भविष्यात याच ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

PWD कडे निवेदन देऊनही काम प्रलंबित :-

दरम्यान, या धोकादायक परिस्थितीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी यापूर्वीच PWD अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. पुलियांचे उघडे भाग तातडीने पाट्या लावून पॅक करावेत, अपूर्ण कामे पूर्ण करावीत तसेच जनावरे व नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली होती.

मात्र, संबंधित कामे अद्याप पूर्ण न झाल्याने अखेर जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न प्रत्यक्ष घटनेतून समोर आला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने आता तरी या समस्येकडे गांभीर्याने पाहून धोकादायक पुलिया व उघडे नाले सुरक्षित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

यावेळी शिवसेना शिंदे गटाचे चामोर्शी तालुका प्रसिद्धी प्रमुख सुरज नैताम, उपप्रमुख विक्की वालदे, सदस्य राहुल चिचघरे, अश्विन बोदलकार यांच्यासह चामोर्शीतील नागरिक व गावकरी उपस्थित होते.

अपूर्ण कामांमुळे भविष्यात जनावरे किंवा नागरिकांना जीवितहानी होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular