VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
टिळक भवनात गडचिरोलीच्या शिष्टमंडळाकडून उत्स्फूर्त स्वागत; डॉ. अजय कंकडालवार यांची प्रमुख उपस्थिती,
महाराष्ट्र /मुंबई, 02 ऑक्टोबर 2026::-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी दादर येथील टिळक भवन येथे प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते आपल्या पदाचा अधिकृतपणे कार्यभार स्वीकारला. यावेळी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह आजी-माजी खासदार, आमदार, मंत्री तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी गडचिरोली जिल्ह्यातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अजय कंकडालवार आणि काँग्रेस नेते पंकज गुड्डेवार यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी टिळक भवन येथे विशेष उपस्थिती लावत डॉ. प्रसाद यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी गडचिरोलीच्या शिष्टमंडळाने डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांना त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, कार्यकर्त्यांशी संवाद अधिक प्रभावी करणे तसेच जनतेच्या विविध प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव आणि संघटनात्मक कार्याचा अनुभव लक्षात घेता, त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील काँग्रेस संघटनेला नवी दिशा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
पदभार स्वीकृती सोहळ्यामुळे टिळक भवन परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. आगामी काळात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी प्रदेश पातळीवर विविध उपक्रमांना गती देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
