VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
राज्यस्तरीय संघटनात्मक बैठकीत डॉ. देवराव होळी यांची उपस्थिती; ‘५१ टक्के मतांचा संकल्प’ साध्य करण्यावर भर,
मुंबई, 09 ऑक्टोबर 2026::-आगामी २०२९ च्या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच संघटनात्मक तयारीला वेग देण्याचे धोरण आखले आहे. प्रत्येक बूथवर पक्षाचे संघटन मजबूत करून सूक्ष्म नियोजनासह (मायक्रो लेव्हल) प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले. ‘५१ टक्के मतांचा संकल्प’ साध्य करण्यासाठी बूथस्तरावरील संघटन हेच विजयाचे प्रमुख सूत्र असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
मुंबईतील दादर येथील वसंत स्मृती सभागृहात ८ ऑक्टोबर २०२६ रोजी भाजपाची राज्यस्तरीय संघटनात्मक बैठक पार पडली. या बैठकीला भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची उपस्थिती होती. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, कार्यकर्त्यांना सक्रिय करणे आणि बूथनिहाय नियोजन अधिक प्रभावी करण्याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी वैजयंत जय पांडा, सोशल मीडिया सहप्रभारी अमित मालवीय, सहप्रभारी सदानंद तानावडे व कमलजीत सेहरावत, प्रदेश संघटन सरचिटणीस अजय जामवाल, प्रदेश सहसंघटनमंत्री सतीश घोडे, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाशजी तसेच प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
एक लाखांहून अधिक बूथ प्रमुखांना सक्षम करण्यावर भर :-
राज्यातील १,२२० मंडलांमधील सुमारे १ लाख २५६ बूथ प्रमुखांना योग्य मार्गदर्शन देऊन प्रशिक्षित करणे, त्यांच्यामध्ये पक्षाच्या विचारधारेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि संघटनात्मक जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्यासाठी सक्षम करणे, यावर बैठकीत भर देण्यात आला. प्रत्येक बूथवर बूथ प्रमुख, कार्यकर्ते आणि सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांचे मजबूत नेटवर्क उभारून नियोजनबद्ध काम करण्याची दिशा यावेळी देण्यात आली.
पक्षाच्या विविध प्रकोष्ठांनीही स्थानिक पातळीवर सक्रिय होऊन आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. विविध मोर्चांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांचा सहभाग वाढवून ‘माझा सहभाग, माझे योगदान’ या भावनेतून संघटन अधिक बळकट करावे, असे आवाहन करण्यात आले. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती आणि लाभ पात्र नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.
आदिवासी समाजापर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचविण्याचा संकल्प :-
या बैठकीत भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांच्या उपस्थितीला विशेष महत्त्व होते. आगामी काळात अनुसूचित जमाती मोर्चाच्या माध्यमातून बूथनिहाय संघटन मजबूत करण्यासोबतच आदिवासी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पक्षाची विचारधारा, केंद्र व राज्य सरकारची विकासकामे आणि विविध कल्याणकारी योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
एकूणच, २०२९ च्या निवडणुकीत विजयाचे लक्ष्य गाठण्यासाठी बूथस्तरापासून संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणे आणि जनसंपर्क वाढविणे, या त्रिसूत्रीवर भाजपाने भर दिल्याचे या राज्यस्तरीय बैठकीतून स्पष्ट झाले.
