Thursday, October 8, 2026
HomeMumbaiधानाचे चुकारे-बोनस वेळेत द्या; संस्थाचालकांचे थकीत भाडे व हमालीही तातडीने अदा करा...

धानाचे चुकारे-बोनस वेळेत द्या; संस्थाचालकांचे थकीत भाडे व हमालीही तातडीने अदा करा…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

आमदार रामदास मसराम यांचा मुंबईतील बैठकीत आक्रमक पवित्रा; धान खरेदी केंद्रे वेळेत सुरू करण्याचीही मागणी,

मुंबई,08 ऑक्टोबर 2026::- नागपूर विभागातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मुंबई येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. धान विक्रीनंतर शेतकऱ्यांना चुकारे व प्रलंबित बोनस वेळेत मिळावा, तसेच शासकीय धान खरेदी केंद्रे चालविणाऱ्या संस्थाचालकांचे थकीत गोदाम भाडे आणि हमालीची रक्कम तातडीने अदा करावी, अशी ठाम मागणी आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामदास मसराम यांनी केली.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस विदर्भातील विविध खासदार, आमदार तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार मसराम यांनी गडचिरोलीसह संपूर्ण नागपूर विभागातील धान उत्पादक शेतकरी आणि धान खरेदी केंद्र चालविणाऱ्या संस्थांना भेडसावणाऱ्या अडचणी प्रभावीपणे मांडल्या.

गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी धान उत्पादनावर अवलंबून आहेत. मात्र, अपुरी धान खरेदी केंद्रे, खरेदीची मर्यादा, धानाची वेळेत उचल न होणे, वाहतूक व गोदामांची कमतरता यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे संस्थाचालकांचे गोदाम भाडे आणि हमालीची रक्कम थकीत असल्याने त्यांच्यावरही आर्थिक भार पडत असल्याचे मसराम यांनी निदर्शनास आणून दिले.

आमदार मसराम यांच्या प्रमुख मागण्या :-

– नागपूर विभागातील सर्व पात्र शासकीय धान खरेदी केंद्रे वेळेत सुरू करावीत.

– शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या प्रमाणात नवीन धान खरेदी केंद्रांना मंजुरी द्यावी.

– खरेदी केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी वाहतूक व धान उचल व्यवस्था सक्षम करावी.

– शासकीय गोदामांची क्षमता वाढवून आवश्यकतेनुसार पर्यायी गोदामांची व्यवस्था करावी.

– ऑनलाइन नोंदणी, स्लॉट, आधार प्रमाणीकरण व बँक खात्यांशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी तालुकास्तरावर मदत कक्ष सुरू करावा.

– धान खरेदीनंतर शेतकऱ्यांचे चुकारे व बोनस कोणत्याही विलंबाशिवाय त्यांच्या खात्यावर जमा करावेत.

– वजन व गुणवत्ता तपासणीसह संपूर्ण खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता ठेवावी.

– शेतकऱ्यांकडून कोणतेही अनधिकृत शुल्क आकारले जाऊ नये.

– दुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यांना जवळच्या ठिकाणी धान विक्रीची सुविधा उपलब्ध करून द्यावी.

– शेतकरी, संस्थाचालक व हमालांच्या तक्रारींच्या तातडीने निवारणासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी.

चुकारे आणि बोनससाठी सकारात्मक चर्चा :-

बैठकीत आमदार मसराम यांनी मांडलेल्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. धान खरेदी प्रक्रिया अधिक सुरळीत, पारदर्शक आणि शेतकरीहिताची करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात आली. विशेषतः धान खरेदीनंतर शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे चुकारे वेळेत मिळावेत तसेच प्रलंबित बोनस अदा करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यावर चर्चा झाली.

किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या धान व भरडधान्याची प्रलंबित देयके तातडीने अदा करण्याचे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांनी यापूर्वीही संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

“गडचिरोलीसह संपूर्ण विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला वेळेत मिळणे आवश्यक आहे. धान खरेदी केंद्रांवरील अडचणी दूर करून खरेदी प्रक्रिया सुलभ करावी आणि शेतकऱ्यांचे चुकारे व बोनस वेळेत त्यांच्या खात्यावर जमा करावेत,” अशी मागणी आमदार रामदास मसराम यांनी केली.

मुंबईतील बैठकीत धान उत्पादकांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाल्याने आगामी धान खरेदी हंगामात शेतकऱ्यांना अधिक सुलभ सुविधा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular