Tuesday, October 6, 2026
HomeChamorshiप्रियदर्शनीत लोकसहभागातून जलसंधारणाला बळ; वनराई बंधाऱ्यांची उभारणी...

प्रियदर्शनीत लोकसहभागातून जलसंधारणाला बळ; वनराई बंधाऱ्यांची उभारणी…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

सेवा संकल्प अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; पाणी अडवा-पाणी जिरवा उपक्रमातून गाव पाणीदार करण्याचा प्रयत्न,

गडचिरोली /चामोर्शी, (प्रियदर्शनी )06 ऑक्टोबर 2026::-सेवा संकल्प अभियानांतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा-२ मध्ये समाविष्ट गावांमध्ये लोकसहभागातून विविध मृद व जलसंधारणाची कामे राबविण्यात येत आहेत. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत सुरू असलेल्या या अभियानाला प्रियदर्शनी गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली गावातील ओढ्यांवर वनराई बंधारे उभारण्यात आले.

गावातील शेतकरी व नागरिकांनी एकत्र येत छोट्या-मोठ्या ओढ्यांवर वनराई बंधारे तयार केले. या बंधाऱ्यांमुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्यास तसेच जमिनीत पाणी मुरण्यास मदत होणार आहे. परिणामी शेतीसाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढण्यास हातभार लागणार असून, आगामी काळात पिके आणि जनावरांसाठी पाण्याची उपलब्धता कायम ठेवण्यास या उपक्रमाचा फायदा होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

पाणी अडवा, पाणी जिरवा; गाव पाणीदार करण्याचा संकल्प :-

जलसंधारणाच्या माध्यमातून पाणी अडवणे, पाणी जिरवणे आणि उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी योग्य वापर करणे शक्य आहे. त्यामुळे लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. शासनाच्या योजनांसोबत ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग लाभल्यास जलसंधारणाची कामे अधिक प्रभावीपणे राबविता येतात, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या उपक्रमावेळी उपकृषी अधिकारी श्री. डोंगरे, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. प्रदीप मुंडे, एनआरएम समन्वयक श्री. दाकोटे (गडचिरोली), समूह सहाय्यक कु. नयन कुमरे, गावातील कृषीताई सौ. अनुराधा चौधरी यांच्यासह शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

महिला शेतकरी प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन :-

दरम्यान, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. प्रदीप मुंडे यांनी उपस्थित महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि संबंधित कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन केले. महिलांनी कृषी विभागाच्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ घेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

लोकसहभागातून जलसंधारणाची कामे उभारून पाण्याचे संवर्धन करण्याच्या दिशेने प्रियदर्शनी गावाने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असून, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा आणि गाव समृद्ध करा’ या संकल्पनेला या उपक्रमातून बळ मिळत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular