VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
रॉंग साइड वाहनचालकांवर कारवाईसह वाहतूक नियमांची जनजागृती; निर्धारित यू-टर्नचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन,
गडचिरोली, 06 ऑक्टोबर 2026::-गडचिरोली शहरातील वाढती वाहनांची संख्या आणि वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता अपघातांना आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक विभागाच्या वतीने ‘ऑपरेशन यू-टर्न’ राबविण्यात येत असून, निर्धारित यू-टर्नचा वापर न करता रॉंग साइडने वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासोबतच वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली जात आहे.
शहरातील प्रमुख मार्ग तसेच महामार्गांवर वाहनचालकांना सुरक्षितपणे दिशा बदलता यावी, यासाठी विविध ठिकाणी नियोजित यू-टर्नची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, काही वाहनचालक वेळ वाचविण्याच्या प्रयत्नात निर्धारित यू-टर्नपर्यंत जाणे टाळून थेट विरुद्ध दिशेने वाहन चालवितात. काही मिनिटांचा हा शॉर्टकट वाहनचालकांसह इतरांच्या जीवासाठीही धोकादायक ठरू शकतो.
रॉंग साइडने वाहन आल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनचालकाला अचानक ब्रेक लावावा लागतो किंवा वाहनाचा मार्ग बदलावा लागतो. त्यामुळे धडक होऊन गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढते. विशेषतः गर्दीच्या वेळेत अशा प्रकारे वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास वाहतुकीचा नैसर्गिक प्रवाह विस्कळीत होऊन इतर वाहनचालकांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागतो.
कारवाईसोबत जनजागृतीवरही भर :-
‘ऑपरेशन यू-टर्न’ केवळ नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यापुरते मर्यादित ठेवण्यात आलेले नाही. वाहनचालकांमध्ये वाहतूक शिस्त निर्माण व्हावी, यासाठी शहरातील विविध ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून जनजागृती करण्यात येत आहे. वाहनचालकांना निर्धारित दिशेनेच वाहन चालविणे, नियोजित यू-टर्नचा वापर करणे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
‘काही मिनिटे वाचविण्यापेक्षा जीवाची सुरक्षा महत्त्वाची आहे. शॉर्टकटच्या नादात रॉंग साइड नको; सुरक्षित प्रवासासाठी निर्धारित यू-टर्नच वापरा,’ असा संदेश गडचिरोली शहर वाहतूक विभागाकडून देण्यात येत आहे.
दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा अनिवार्य वापर करावा, चारचाकी वाहनचालकांनी सुरक्षित वेग राखावा तसेच वाहन चालविताना स्वतःसोबतच इतर वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचाही विचार करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ही मोहीम पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा आणि सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी सपोनि. शरद मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे.
