VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली–छत्तीसगड महामार्गाची तातडीने दुरुस्ती करा; शिवसेना ठाकरे गटाचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा,
गडचिरोली, 07 ऑक्टोबर 2026::-
गडचिरोली जिल्ह्यातून छत्तीसगड राज्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ९३० (NH-930) ची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या महामार्गाची तातडीने दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख पवन राघोजी गेडाम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.
गडचिरोली–छत्तीसगड दरम्यानच्या वाहतुकीसाठी हा महामार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, सध्या या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे वाहनांचे नुकसान होत असून, अपघाताची शक्यताही वाढली आहे. नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि नियमित प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना या दुरवस्थेचा मोठा फटका बसत आहे.
महामार्गाची तातडीने पाहणी करून खड्डे बुजविणे, खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करणे तसेच आवश्यक त्या ठिकाणी दर्जेदार डांबरीकरण करण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशारा :-
महामार्गाची दुरवस्था ही केवळ गैरसोयीची बाब नसून नागरिकांच्या जीविताशी संबंधित गंभीर समस्या असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांनी दिला आहे.
यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले असून, त्याची प्रत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री यांनाही देण्यात आली आहे.
यावेळी गडचिरोली लोकसभा प्रमुख महेश केदारी, सहसंपर्क प्रमुख डॉ. बनसोड, जिल्हाप्रमुख पवन गेडाम, संघटक नंदू भाऊ कुंभरे, उपजिल्हाप्रमुख अतुल नैताम, शहरप्रमुख पप्पू शेख, युवासेना शहरप्रमुख प्रफुल्ल कोसे, युवासेना उपजिल्हाप्रमुख चेतन उरकुडे, अमोल कुळमेथे, माजी सरपंच तुषार मडावी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
