VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; जिल्ह्यातील उर्वरित १० तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्याचीही मागणी,
नागपूर, 07 ऑक्टोबर 2026::-
गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, कृषी, पाणी, रोजगार, शिक्षण आणि आदिवासी भागातील मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले. यासंदर्भात त्यांनी नागपूर येथील रामगिरी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध विकासात्मक प्रश्नांवर चर्चा केली.
यावेळी ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’ अंतर्गत गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ‘गोंडवाना वैद्यकीय महाविद्यालय, गडचिरोली’ असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी डॉ. होळी यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.
गडचिरोली जिल्ह्याला समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आदिवासी वारसा लाभला आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय महाविद्यालयाला ‘गोंडवाना’ हे नाव दिल्यास जिल्ह्याच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळखीला अधोरेखित करणारे ठरेल, अशी भूमिका डॉ. होळी यांनी मांडली. गडचिरोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना २०२४ मध्ये झाली असून सध्या ते कार्यरत आहे.
उर्वरित १० तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा :-
गडचिरोली जिल्ह्यातील उर्वरित १० तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात यावा, अशी मागणीही डॉ. होळी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. केवळ प्रशासकीय निकषांवर निर्णय न घेता संबंधित तालुक्यांमधील प्रत्यक्ष पिकांची स्थिती, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीची पाहणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
दुष्काळग्रस्त परिस्थितीचा परिणाम झालेल्या शेतकरी व नागरिकांना शासनाच्या नियमानुसार आवश्यक सवलती, मदत व उपाययोजनांचा लाभ मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आरोग्य सुविधांचे बळकटीकरण, शेती व सिंचनाला चालना, रोजगाराच्या संधी, शिक्षणाचा विस्तार तसेच आदिवासी भागातील रस्ते, पाणी आणि इतर मूलभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर देण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. देवराव होळी यांनी यावेळी नमूद केले.
