VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी,
गावागावात प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे निर्देश,
अनुदानाच्या कृषी निविष्ठांचा लाभ सर्व शेतकऱ्यांना देण्याची मागणी,
गडचिरोली /आरमोरी, १७ सप्टेंबर २०२६ ::-आरमोरी विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील विविध भागांत धान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त होत आहेत. ऐन पीक वाढीच्या काळात रोगराईचे संकट निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रामदासजी मसराम यांनी आरमोरी येथील विश्रामगृहात तालुका कृषी अधिकारी गेडाम यांच्यासोबत बैठक घेऊन धान पिकाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी व विविध समस्या कृषी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत धान पिकाचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार मसराम यांनी दिले. केवळ कार्यालयीन पातळीवर माहिती घेण्याऐवजी कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गावागावात प्रत्यक्ष भेटी देऊन शेतांची पाहणी करावी आणि रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, आमदार रामदास मसराम यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गडचिरोली श्रीमती प्रीती हिरळकर तसेच कृषी विकास अधिकारी, गडचिरोली श्रीमती खोमणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. धान पिकावरील रोगाची तातडीने पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
“आजच तातडीने उपाययोजना केली नाही, तर पुढील १५ ते २० दिवसांत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ शकतो. त्यामुळे कृषी विभागाने कोणताही विलंब न करता गावागावात पोहोचून धान पिकाची पाहणी करावी. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक उपाययोजना उपलब्ध करून द्याव्यात,” असे आमदार मसराम यांनी स्पष्ट केले.
सर्वसामान्य शेतकऱ्यांनाही अनुदानाचा लाभ मिळावा :-

यावेळी कृषी निविष्ठांच्या अनुदानाच्या मुद्द्यावरही आमदार मसराम यांनी लक्ष वेधले. पूर्वी शेतकऱ्यांना औषधे, खते आणि इतर आवश्यक कृषी निविष्ठा अनुदानावर उपलब्ध होत होत्या. मात्र सध्या अनेक योजनांचा लाभ प्रामुख्याने शेतकरी गटांपुरता मर्यादित राहत असल्याने सामान्य शेतकरी या सुविधांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
अनुदानावरील औषधे, खते आणि आवश्यक कृषी निविष्ठांचा लाभ केवळ काही गटांपुरता मर्यादित न ठेवता सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, अशी मागणी आमदार मसराम यांनी केली. पीक संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसोबतच तांत्रिक मार्गदर्शन आणि आवश्यक कृषी निविष्ठा वेळेत उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांच्या अडचणींकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहावे आणि शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावा, अशी अपेक्षाही आमदार मसराम यांनी व्यक्त केली.
या बैठकीप्रसंगी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे यांच्यासह संबंधित उपस्थित होते.
