VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली /चामोर्शी, 08 ऑक्टोबर 2026::-शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यासाठी बँकेतून काढून आणलेली तब्बल ५ लाख ५० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी दिवसाढवळ्या लंपास केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (७ ऑक्टोबर) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास चामोर्शी शहरातील बसस्थानक परिसरात घडली. ‘तुमची शंभर रुपयांची नोट खाली पडली आहे’ अशी बतावणी करून एकाचे लक्ष विचलित केले आणि दुसऱ्या साथीदाराने दुचाकीच्या टाकीवर ठेवलेली पैशांची बॅग पळवून नेली.
जय गणेश शेतकरी पुरुष बचत गट, लखमापूर-बोरीचे अध्यक्ष घनश्याम बोलीवार आणि सचिव रामचंद्र सत्तरवार हे शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यासाठी चामोर्शी येथील बँक ऑफ इंडिया शाखेत आले होते. दुपारी साडेबारा वाजता बँकेतून ५ लाख ५० हजार रुपये काढल्यानंतर ही रक्कम बॅगेत ठेवून दोघे दुचाकीने निघाले.
बसस्थानक परिसरातील सुमित मेडिकलजवळ ते काही वेळ थांबले. घनश्याम बोलीवार हे खरेदीसाठी दुकानात गेले, तर रामचंद्र सत्तरवार हे बसस्थानकाच्या दिशेने गेले. याच वेळी एका अनोळखी व्यक्तीने सत्तरवार यांना मागून आवाज देत ‘तुमची शंभर रुपयांची नोट खाली पडली आहे’ असे सांगितले.
सत्तरवार यांनी मागे वळून पाहताच, आधीपासून टपून बसलेल्या त्याच्या साथीदाराने दुचाकीच्या टाकीवर ठेवलेली रोकड असलेली बॅग हातोहात लंपास केली आणि दोघेही तेथून पसार झाले. काही क्षणांतच बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, त्यांच्या संभाव्य हालचाली आणि पळून जाण्याचे मार्ग तपासले जात आहेत.
दरम्यान, आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसून पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. शहरातील वर्दळीच्या परिसरात दिवसाढवळ्या साडेपाच लाखांची चोरी झाल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
