Thursday, October 8, 2026
HomeGadchiroliकबड्डीत गडचिरोलीच्या मुलींचा ऐतिहासिक डंका...

कबड्डीत गडचिरोलीच्या मुलींचा ऐतिहासिक डंका…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

५३ व्या ज्युनियर राज्य अजिंक्यपद निवड चाचणीत गडचिरोली संघ ठरला विदर्भाचा विजेता,

गडचिरोली, 08 ऑक्टोबर 2026::-

मूर्तिजापूर येथे पार पडलेल्या ५३ व्या राज्य अजिंक्यपद ज्युनियर कबड्डी निवड चाचणी स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याच्या मुलींच्या संघाने दमदार कामगिरी करत प्रथमच अजिंक्यपद पटकावले. या ऐतिहासिक विजयामुळे गडचिरोलीच्या कबड्डी क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

ही स्पर्धा २ ते ४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान अमुचेर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माई सोशल बहुउद्देशीय क्रीडा मंडळ, मूर्तिजापूर यांच्या आयोजनातून पार पडली. स्पर्धेत विदर्भातील १२ जिल्ह्यांमधून २० वर्षांखालील मुलांचे १५ आणि मुलींचे १५ असे एकूण ३० संघ सहभागी झाले होते.

गडचिरोलीच्या मुलींच्या संघाने क गटातील सामन्यांत नागपूर शहर, यवतमाळ आणि वर्धा संघांवर विजय मिळवत आगेकूच केली. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत वाशिम जिल्ह्याचा, तर उपांत्य सामन्यात चंद्रपूर जिल्ह्याचा पराभव करत अंतिम फेरी गाठली.

अंतिम सामन्यात गडचिरोलीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत भंडारा जिल्ह्याच्या संघावर मात केली आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले. गडचिरोली जिल्ह्याने या स्पर्धेत प्रथमच अजिंक्यपद मिळविल्याने हा विजय जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानास्पद मानला जात आहे.

संघाला कोच आशिष बिस्वास, गौरव चिमूरकर आणि व्यवस्थापक जयश्री वूरुवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संघाची तयारी करण्यासाठी प्रशांत कोटगले व तृणाल पुडो यांनी विशेष परिश्रम घेतले.

या यशासाठी जिल्हा कबड्डी असोसिएशन गडचिरोलीचे अध्यक्ष राजेश कात्रटवार, सचिव राजेंद्र गार्गेलवार, जगदीश मस्के तसेच असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य यांचे सहकार्य लाभले.

गडचिरोलीच्या मुलींच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे जिल्ह्याच्या कबड्डी क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात झाली असून, या विजयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular