VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
थकीत मजुरीसाठी डॉ. अजय कंकडालवार यांना निवेदन; १३ ऑक्टोबरपासून साखळी उपोषणाचा इशारा,
गडचिरोली /अहेरी, 11 ऑक्टोबर 2026::- आल्लापल्ली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी मध्यवर्ती काष्ठ भांडारात ओढणावळ, मोजमाप व गटबांधणीची कामे करणाऱ्या मजुरांची मागील पाच महिन्यांपासून मजुरी थकीत असल्याने त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. मे २०२६ पासून कामाची मजुरी मिळाली नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या मजुरांनी काँग्रेस नेते तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अजय कंकडालवार यांची भेट घेऊन थकीत मजुरी मिळवून देण्याची मागणी केली. यासंदर्भात त्यांनी निवेदनही सादर केले असून, मजुरी न मिळाल्यास १३ ऑक्टोबरपासून संबंधित कार्यालयासमोर साखळी उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
आल्लापल्ली येथील मध्यवर्ती काष्ठ भांडारात म.का.भो.क्र. १ अंतर्गत जंगलातून प्राप्त होणाऱ्या इमारती लाकडाचे मोजमाप करणे, त्याची ओढणावळ करणे आणि गटबांधणीची कामे मजूर करतात. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून या कामांची मजुरी मिळालेली नसल्याने मजुरांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
उधारी बंद, सावकाराच्या कर्जाचा वाढता बोजा :-
मजुरी थकल्यामुळे घरखर्च भागविणेही कठीण झाले आहे. दुकानदारांनी उधारी देणे बंद केले असून, दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मजुरांना सावकारांकडून १० टक्के व्याजाने कर्ज घ्यावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आधीच मजुरी मिळत नसताना कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न मजुरांसमोर उभा ठाकला आहे.
मुलांचे शिक्षण, आजारपणातील औषधोपचार, आठवडी बाजार आणि घरातील दैनंदिन खर्च भागविताना मजुरांची मोठी आर्थिक ओढाताण होत आहे. संबंधित कार्यालयाकडे मजुरी मिळण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही अद्याप पैसे मिळाले नसल्याची व्यथा मजुरांनी व्यक्त केली आहे.
१३ ऑक्टोबरपासून आंदोलनाचा इशारा :-
थकीत मजुरी तातडीने मिळवून देण्यासाठी डॉ. अजय कंकडालवार यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी मजुरांनी निवेदनातून केली आहे. मजुरीचा प्रश्न त्वरित मार्गी न लागल्यास १३ ऑक्टोबरपासून संबंधित विभागाच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच प्रस्तावित आंदोलनाला आवश्यक सहकार्य व पाठिंबा देण्याचे आवाहनही मजुरांनी केले आहे.
पाच महिन्यांपासून मजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या या मजुरांचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून, संबंधित विभाग प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि मजुरांना त्यांची थकीत मजुरी कधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
