VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या उपस्थितीत १०० हून अधिक नागरिकांशी संवाद; तक्रारींच्या निपटाऱ्यासह सायबर सुरक्षेबाबत जनजागृती,
देसाईगंज, 10 ऑक्टोबर 2026::- नागरिकांच्या तक्रारींचे प्रभावी निराकरण करून त्यांना न्याय मिळवून देण्यासोबतच सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने शनिवार, १० ऑक्टोबर रोजी देसाईगंज पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिन व सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला १०० हून अधिक नागरिक उपस्थित होते. यावेळी विविध तक्रारींचा निपटारा करण्यात आला, तर आर्थिक फसवणुकीला बळी पडलेल्या पीडितेला एक लाख रुपये परत मिळवून देण्यात आले.
तक्रारींच्या निपटाऱ्यासाठी पोलीस अधीक्षकांचे निर्देश :-

तक्रार निवारण दिनादरम्यान नागरिकांनी मांडलेल्या समस्या व तक्रारींची पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी दखल घेत संबंधित अधिकारी व अंमलदारांना आवश्यक सूचना दिल्या. वरिष्ठ अर्जांच्या पाच प्रकरणांपैकी चार प्रकरणांचा बैठकीत निपटारा करण्यात आला. उर्वरित एका प्रकरणात पुढील सात दिवसांत चौकशी करून गुन्हा दाखल करावा किंवा कायदेशीर प्रक्रियेनुसार निपटारा करावा, असे निर्देश देण्यात आले. तसेच दोन स्थानिक अर्जांचाही निपटारा करण्यात आला. यावेळी पोलीस ठाण्यात नव्याने कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याची माहिती देण्यात आली.
पीडितेला एक लाख रुपये परत :-

या कार्यक्रमातील महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, पॉक्सो प्रकरणातील पीडित मुलीला मनोधैर्य योजनेंतर्गत मिळालेल्या आर्थिक मदतीत फसवणूक झाल्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. या प्रकरणाची पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी गांभीर्याने दखल घेत पीडितेची प्रत्यक्ष भेट घेतली. तसेच संबंधित गैर-अर्जदाराला बोलावून प्रकरणाबाबत कार्यवाही केली. त्यानंतर फसवणूक झालेली संपूर्ण एक लाख रुपयांची रक्कम पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या हस्ते पीडितेला परत करण्यात आली.
सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन :-
गडचिरोली पोलीस दलातर्फे १ ते ३१ ऑक्टोबर हा कालावधी ‘सायबर जनजागृती महिना’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमात नागरिकांना ऑनलाइन आर्थिक फसवणूक, बनावट लिंक, अनोळखी व्यक्तींकडून येणारे फोन व संदेश, बनावट गुंतवणूक योजना आणि बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहितीच्या आधारे होणाऱ्या फसवणुकीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कोणत्याही अनोळखी व्यक्तीला ओटीपी, एटीएम पिन, पासवर्ड किंवा बँक खात्याची गोपनीय माहिती देऊ नये. अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळावे आणि ऑनलाइन व्यवहार करताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले. सायबर फसवणूक झाल्यास तातडीने राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असेही सांगण्यात आले.
पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समस्यांवरही चर्चा :-

या कार्यक्रमासोबतच ‘ऑल हॅन्ड्स मीट’ उपक्रमांतर्गत देसाईगंज पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांची बैठक घेण्यात आली. पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजातील अडचणी, समस्या व वैयक्तिक अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यावर चर्चा करण्यात आली.
यावेळी पोलीस अधीक्षक एम. रमेश, कुरखेडा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे, देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्निल इज्जपवार आणि तक्रार व अर्ज शाखेच्या महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतीक्षा राठोड उपस्थित होते.
नागरिकांनी आपल्या अडचणी व तक्रारी थेट पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे आवाहन पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी यावेळी केले. नागरिक आणि पोलीस यांच्यातील संवाद अधिक दृढ करून तक्रारींचे प्रभावी निराकरण करण्यावर या उपक्रमातून भर देण्यात आला.
