VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
कुरखेडा मंडलात ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान-२०२६’ अंतर्गत निवासी कार्यशाळेची सुरुवात,
गडचिरोली /कुरखेडा,१३ एफ्रिल २०२६::-पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान-२०२६ अंतर्गत भारतीय जनता पार्टी कुरखेडा मंडलाच्या वतीने श्री भगवान महादेव देवस्थान, अरततोंडी (ता. कुरखेडा) येथे आयोजित दोनदिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या कार्यशाळेचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे व माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या हस्ते महादेवाची विधिवत पूजा करून करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रशांत वाघरे बोलत होते. त्यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीची ताकद ही तिच्या समर्पित कार्यकर्त्यांमध्ये असून, नियमित प्रशिक्षण, संघटनात्मक शिस्त आणि समाजाशी सातत्याने ठेवलेला संपर्क यामुळेच पक्ष देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनला आहे.

ते पुढे म्हणाले की, प्रत्येक कार्यकर्त्याने बूथ पातळीपर्यंत संघटन मजबूत करण्यावर भर देत जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधला पाहिजे. शासनाच्या विविध योजनांची माहिती घराघरांत पोहोचवून लाभार्थ्यांपर्यंत त्या पोहोचविणे हीच खरी पक्षसेवा आहे.

प्रशांत वाघरे यांनी अधोरेखित केले की, पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या ध्येयवाक्याच्या आधारे देशाचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. गरीब, शेतकरी, महिला आणि युवकांच्या सशक्तीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडत आहे.

तसेच, “सत्ता ही सेवेचे साधन” या तत्त्वावर काम करताना प्रत्येक कार्यकर्त्याने प्रामाणिकपणे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी केले. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदय विचारांना प्रत्यक्षात आणणे हीच भाजप कार्यकर्त्यांची खरी जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी माजी आमदार कृष्णाजी गजबे यांनीही मार्गदर्शन करताना संघटन बळकटीकरणासाठी अशा प्रशिक्षण उपक्रमांचे महत्त्व विशद केले.
या कार्यक्रमास महादेव गड देवस्थानचे अध्यक्ष तथा माजी भाजपा तालुका अध्यक्ष डॉ. ते. ना. बुद्धे, भाजप तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, ज्येष्ठ नेते विलास गावंडे, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष बबलू हुसेनी, ओबीसी जिल्हा महामंत्री रवींद्र गोटेफोडे, नगरसेवक ॲड. उमेश वालदे, जिल्हा सचिव रूपाली गावडे, भाजपा महिला शहर अध्यक्ष कल्पना मांडवे, महामंत्री प्रा. विनोद नागपूरकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चांगदेव फाये यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. विनोद नागपूरकर यांनी केले. या प्रशिक्षण कार्यशाळेत तालुक्यातील भाजप पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
