Saturday, September 5, 2026
HomeKurakhedaदारूसाठ्यासह वाहन जप्त; कुरखेडा पोलिसांची कारवाई; २ लाख ७७ हजार ६०० रुपयांचा...

दारूसाठ्यासह वाहन जप्त; कुरखेडा पोलिसांची कारवाई; २ लाख ७७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली /कुरखेडा,२९ ऑगस्ट २०२६::- गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैधरित्या देशी-विदेशी दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात गडचिरोली पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. याच मोहिमेंतर्गत कुरखेडा पोलिसांनी सापळा रचून अवैध दारूसाठ्यासह चारचाकी वाहन असा एकूण २ लाख ७७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार २७ ऑगस्ट २०२६ रोजी कुरखेडा पोलीस पथक रात्रीच्या गस्तीवर असताना गोपनीय बातमीदारामार्फत वडसा-कुरखेडा मार्गावर एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून अवैध देशी-विदेशी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली.

माहितीच्या आधारे पोलिसांनी वडसा-कुरखेडा मार्गावर तात्पुरता नाकाबंदी अडथळा उभारला. संशयित वाहन येताना दिसताच पोलिसांनी ते थांबवून चालकाची चौकशी केली. त्याने आपले नाव सौरभ संतोष डहाळे (वय २५), रा. चिखली, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली असे सांगितले.

पंचासमक्ष वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये देशी दारू संत्री कंपनीचे २० बॉक्स, एकूण २ हजार नग, किंमत १ लाख २० हजार रुपये; रॉयल स्टॅग विदेशी दारूचे २ बॉक्स, ९६ नग, किंमत ३८ हजार ४०० रुपये; तसेच सह्याद्री गोल्ड विदेशी दारूचा १ बॉक्स, ४८ नग, किंमत १९ हजार २०० रुपये असा दारूसाठा आढळून आला.

याशिवाय अवैध दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी रिट्झ (एमएच १२ एनबी २०८५) ही चारचाकी कार, अंदाजे १ लाख रुपये किमतीची, पोलिसांनी जप्त केली. अशाप्रकारे दारूसाठा व वाहन मिळून एकूण २ लाख ७७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत सौरभ डहाळे याने सदर दारूसाठा मोहन लांजेवार (वय ४२), रा. केशोरी, ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया याचा असल्याचे सांगितले. याप्रकरणी कुरखेडा पोलीस ठाण्यात अप. क्र. १९३/२०२६, कलम ६५ (अ), ८३ महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये सौरभ संतोष डहाळे व मोहन लांजेवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा व उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली, कुरखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या नेतृत्वात पोउपनि. कुणाल रेगूलवार, पोहवा संतोष कांबळे व चामपोशि अरुणा लोहंबरे यांनी पार पाडली.

अवैध दारू वाहतुकीविरोधातील या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा गैरप्रकारांविरोधात पोलिसांची कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular