Sunday, September 20, 2026
HomeDhanoraगट्टा पोलिसांचा सुगंधित तंबाखूच्या अवैध कारखान्यावर छापा; २२.५० लाखांचा मुद्देमाल जप्त!...

गट्टा पोलिसांचा सुगंधित तंबाखूच्या अवैध कारखान्यावर छापा; २२.५० लाखांचा मुद्देमाल जप्त!…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

चार आरोपी अटकेत; स्कॉर्पिओसह तंबाखू उत्पादन व पॅकिंग साहित्य जप्त, एक आरोपी फरार,

गडचिरोली / धानोरा, 20 सप्टेंबर 2026::- महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूचे अवैध उत्पादन, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. धानोरा तालुक्यातील जांभळीझोरा येथे करण्यात आलेल्या या कारवाईत सुगंधित तंबाखूचा साठा, उत्पादन व पॅकिंगसाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री आणि महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन असा एकूण २२ लाख ५० हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून, एक आरोपी फरार आहे.

गडचिरोली जिल्ह्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, अवैध दारू, जुगार तसेच इतर अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी सर्व पोलीस ठाणे, उपपोलीस ठाणे आणि पोलीस मदत केंद्रांना प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याच अनुषंगाने पोलीस मदत केंद्र गट्टा (फु.) येथील पथकाने ही कारवाई केली.

गोपनीय माहितीच्या आधारे छापा :-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस मदत केंद्र गट्टा (फु.) येथील पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अजीत जोहन कुजूर (वय २२, रा. जांभळीझोरा, ता. धानोरा, जि. गडचिरोली) हा आपल्या राहत्या घरी शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूचे बेकायदेशीर उत्पादन करून विक्री करीत आहे.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी १९ सप्टेंबर रोजी संबंधित ठिकाणी धाड टाकली. कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून पंचांसमक्ष घराची आणि परिसराची पाहणी करण्यात आली. यावेळी घरातील एका चुंगळीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. तसेच तंबाखूच्या पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे साहित्यही पोलिसांच्या हाती लागले.

त्यानंतर परिसराची पाहणी केली असता, घराजवळ उभ्या असलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओ वाहनाच्या मागील सीटखाली दोन पिवळ्या आणि दोन पांढऱ्या रंगांच्या चुंगळ्यांमध्ये सुगंधित तंबाखू आढळून आला.

 ( तंबाखू, यंत्रसामग्री आणि वाहन जप्त )

या कारवाईत पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे. :-

– सुगंधित तंबाखू: १०३ पांढऱ्या रंगांच्या चुंगळ्या — अंदाजे किंमत १२ लाख ५ हजार ३८० रुपये.

– वाहनातील सुगंधित तंबाखू: दोन पांढऱ्या व दोन पिवळ्या रंगांच्या चुंगळ्या — अंदाजे किंमत ३ लाख ५ हजार १०० रुपये.

– हुक्का शिशा तंबाखू: ‘मजा १०८’ असे नमूद असलेली १० पॉलीथीन पॅकेट्स — अंदाजे किंमत १३ हजार २५० रुपये.

– पॅकिंग साहित्य व यंत्रसामग्री: बॅक क्लोजर मशीन, ऑटोमॅटिक फिल्म सीलिंग मशीन, पोर्टेबल बॅग शिलाई मशीन आणि स्ट्रेटनर मशीन — अंदाजे किंमत १ लाख २५ हजार ५०० रुपये.

– महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन: क्रमांक MH 33 AC 5170 — अंदाजे किंमत ६ लाख रुपये.

अशा प्रकारे एकूण २२ लाख ५० हजार २३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

पाच आरोपींची नावे निष्पन्न; चौघांना अटक :-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजीत जोहन कुजूर याच्याकडे मुद्देमालाबाबत चौकशी केली असता, त्याने प्रशांत याडवार (रा. गडचिरोली) याचे नाव सांगितले. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल प्रशांत याडवार याचा असल्याचे त्याने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तसेच साईनाथ टाटाजी कन्नाके (वय ३९) आणि सचिन ज्ञानेश्वर कन्नाके (वय ३२), दोघेही रा. ढोरप, ता. पवनी, जि. भंडारा, तसेच अभिजित यादव नान्हे (रा. उमरेड, जि. नागपूर) हे प्रशांत याडवार याचे साथीदार असल्याचेही चौकशीत निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

अन्न व औषध प्रशासन विभाग, गडचिरोली यांच्या फिर्यादीवरून पोलीस मदत केंद्र गट्टा (फु.) येथे पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा क्रमांक ५४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३(५), २७५, २७४, २२३ व १२३ तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील अजीत जोहन कुजूर, साईनाथ टाटाजी कन्नाके, सचिन ज्ञानेश्वर कन्नाके आणि अभिजित यादव नान्हे या चार आरोपींना २० सप्टेंबर २०२६ रोजी अटक करण्यात आली आहे. फरार आरोपी प्रशांत याडवार याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई :-

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज. जी. आणि सहायक पोलीस अधीक्षक, धानोरा श्री. सुयश कुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पोलीस मदत केंद्र गट्टा (फु.) येथील पोलीस उपनिरीक्षक दयानंद भोंबे व पोलीस अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दयानंद भोंबे करीत आहेत.

प्रतिबंधित सुगंधित तंबाखूच्या अवैध उत्पादन व साठवणुकीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular