VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
नक्षलवादाच्या सावटातून विकासाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गडचिरोलीत देशस्तरीय जनजातीय गौरव दिनाचे आयोजन अभिमानास्पद – केंद्रीय मंत्री जुएल ओराम; ४० हजार कलाकारांची नोंदणी, अडीच हजार कलाकारांना राज्यस्तरीय व्यासपीठ,
गडचिरोली, 14 नोव्हेंबर 2026 :-क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘भगवान बिरसा कला संगम २.०’ या राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आदिवासी कलाकारांच्या पारंपरिक लोकनृत्य, गायन, वादन, हस्तकला आणि आधुनिक डिजिटल कलाविष्कारांनी गडचिरोलीची भूमी आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी न्हाऊन निघाली. या महोत्सवाच्या माध्यमातून आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, शौर्य, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे.

या कार्यक्रमात केंद्रीय जनजातीय कार्यमंत्री जुएल ओराम यांनी गडचिरोलीत देशस्तरीय जनजातीय गौरव दिनाचे आयोजन होणे ही बदलत्या परिस्थितीची आणि विकासाच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीची महत्त्वपूर्ण ओळख असल्याचे प्रतिपादन केले. राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रसिद्ध अभिनेते भरत गणेशपुरे यांच्यासह केंद्र व राज्य शासनातील विविध मान्यवर उपस्थित होते.
नक्षलवादाच्या सावटातून विकासाच्या नव्या पर्वाकडे :-
केंद्रीय मंत्री जुएल ओराम म्हणाले की, एकेकाळी नक्षलवादाच्या प्रभावामुळे गडचिरोलीत राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करणे आव्हानात्मक होते. मात्र, आता याच जिल्ह्यात देशस्तरीय जनजातीय गौरव दिनाचा मुख्य सोहळा आयोजित होत आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली नक्षलवादाविरोधात करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे परिस्थितीत सकारात्मक बदल घडत असून गडचिरोली विकासाच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करीत आहे.
आदिवासी समाजाचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, त्याग आणि शौर्य देशासमोर आणणे आवश्यक आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्यासह क्रांतिवीर बाबूराव शेडमाके, तंट्या भिल्ल, राघोजी भांगरे अशा अनेक आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष केला. त्यांच्या बलिदानाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे. आदिवासी क्रांतिकारकांच्या स्मृती जतन करण्यासाठी देशभर संग्रहालये उभारणे, ऐतिहासिक दस्तऐवजांचे संकलन आणि डिजिटायझेशन करण्यावर केंद्र शासन भर देत असल्याचे त्यांनी सांगितले.
१९९९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी स्वतंत्र जनजातीय कार्य मंत्रालयाची स्थापना केली. त्यानंतर २०२१ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली १५ नोव्हेंबर हा भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिन ‘जनजातीय गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. देशातील ७०० हून अधिक आदिवासी समुदायांचा इतिहास आणि संस्कृती सन्मानाने पुढे आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे ओराम यांनी स्पष्ट केले.
कलाकारांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच खरा जनजातीय गौरव :-

आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी ग्रामीण आणि दुर्गम भागातील कलाकारांना राज्यस्तरीय व्यासपीठ मिळणे ही सांस्कृतिक क्षेत्रातील मोठी संधी असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, जनजातीय गौरव दिन म्हणजे केवळ औपचारिक कार्यक्रम किंवा मान्यवरांचा सत्कार नव्हे, तर दुर्गम भागात राहणाऱ्या सर्वसामान्य आदिवासी बांधवांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. एखाद्या ग्रामीण कलाकाराला मोठ्या व्यासपीठावर आपली कला सादर करण्याची संधी मिळते आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलतो, हाच खरा जनजातीय गौरव असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
‘भगवान बिरसा कला संगम’ उपक्रमासाठी ९ जूनपासून राज्यभर विविध स्तरांवर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या उपक्रमात सुमारे ४० हजार कलाकारांनी नोंदणी केली असून त्यातून निवड झालेल्या सुमारे अडीच हजार कलाकारांना गडचिरोलीतील राज्यस्तरीय महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. पुढील वर्षी ही नोंदणी ६० हजारांपर्यंत नेण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.
आदिवासी भाषा आणि संस्कृती जतन करा – भरत गणेशपुरे :-
प्रसिद्ध अभिनेते भरत गणेशपुरे यांनी आदिवासी समाजाच्या मातृभाषा, बोलीभाषा आणि सांस्कृतिक ओळखीचे जतन करण्याचे आवाहन केले. शिक्षण, रोजगार आणि व्यवसायासाठी शहरात स्थायिक झाल्यानंतरही आपली मातृभाषा विसरता कामा नये. आपण स्वतः भाषा बोलण्याबरोबरच पुढील पिढीलाही ती शिकविणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
आदिवासी समाजाची हस्तकला, बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तू, पारंपरिक खाद्यपदार्थ आणि स्थानिक उत्पादनांना व्यापक बाजारपेठ व ओळख मिळाली पाहिजे. आधुनिक समाजमाध्यमांच्या माध्यमातून लोककला, नृत्य आणि कलाकारांचे सादरीकरण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
पारंपरिक कलेसोबत डिजिटल कलाविष्कारांनाही व्यासपीठ :-
‘भगवान बिरसा कला संगम २.०’चे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक आदिवासी कलांसोबत आधुनिक डिजिटल कलाप्रकारांचाही समावेश करण्यात आला आहे. लोकनृत्य, लोकसंगीत, गायन, वाद्यवादन, चित्रकला, हस्तकला, पारंपरिक पूजाविधी यांसोबत रील्स, ब्लॉग, माहितीपट आणि लघुपट अशा माध्यमांतूनही कलाकारांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळत आहे.
पारंपरिक कलाप्रकारांमधून १ हजार १ कलाकारांची राज्यस्तरीय फेरीसाठी निवड करण्यात आली असून आदिवासी संस्कृतीचे आधुनिक माध्यमांतून सादरीकरण करणाऱ्या सुमारे २५० आशयनिर्मात्यांचीही निवड झाली आहे. या माध्यमातून आदिवासी सांस्कृतिक वारशाचे दस्तऐवजीकरण करून तो पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
बिरसा मुंडांच्या जीवनावर विशेष नाट्यप्रयोग :-
महोत्सवात विविध आदिवासी सांस्कृतिक सादरीकरणांसह भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर आधारित विशेष नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या संघर्षाची आणि आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी केलेल्या लढ्याची शौर्यगाथा या नाट्यप्रयोगातून सादर केली जाणार आहे.
१५ नोव्हेंबरला देशस्तरीय मुख्य सोहळा :-
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त उद्या, १५ नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा संकुलात देशस्तरीय जनजातीय गौरव दिनाचा मुख्य शासकीय सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे या सोहळ्याचे उद्घाटन करून देशवासीयांना मार्गदर्शन करणार आहेत. राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्र व राज्य शासनातील मान्यवरांची उपस्थिती नियोजित आहे.
या कार्यक्रमाला राज्यसभा सदस्य माया इवनाते, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबाळकर, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त मीना बनसोड, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, प्रसिद्ध अभिनेते भरत गणेशपुरे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, नामदेव उसेंडी, कृष्णा गजबे, प्रकाश गेडाम, रमेश बारसागडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, आदिवासी समाजातील मान्यवर, कलाकार आणि नागरिक उपस्थित होते.
गडचिरोलीच्या भूमीतून आदिवासींच्या शौर्याचा, संस्कृतीचा आणि परंपरांचा राष्ट्रीय गौरव होत असून ‘भगवान बिरसा कला संगम २.०’च्या माध्यमातून आदिवासी कलावंतांना मिळालेले हे व्यासपीठ सांस्कृतिक जतनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
