VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
फुटलेल्या पाईपलाईनमुळे महिलांची पाण्यासाठी वणवण; पावसाळ्यात पुलिया पाण्याखाली जात असल्याने गावाचा भामरागडशी संपर्क तुटतो, महाराजांनी अधिकाऱ्यांशी साधला थेट संवाद,
गडचिरोली /भामरागड, 13 नोव्हेंबर 2026 :-भामरागड नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोयनगुडा गावातील पाणीपुरवठा आणि पुलियाच्या गंभीर समस्यांमुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या दोन्ही ज्वलंत प्रश्नांकडे ग्रामस्थांनी माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांचे लक्ष वेधले. ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत महाराजांनी पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर थेट संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या, तर पुलियाच्या प्रश्नावर प्रशासनाकडे पाठपुरावा करून कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
कोयनगुडा गावातील पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यामुळे पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. परिणामी नागरिकांना नियमित पाणी मिळत नसून महिलांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. दैनंदिन गरजांसाठी पाण्याची व्यवस्था करताना महिलांना होणारा त्रास ग्रामस्थांनी महाराजांच्या निदर्शनास आणून दिला. याची तातडीने दखल घेत राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी भामरागड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित सोनवणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. फुटलेली पाईपलाईन तातडीने दुरुस्त करून गावातील पाणीपुरवठा पूर्ववत करावा आणि नागरिकांना नियमित पाणी उपलब्ध करून द्यावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
पावसाळ्यात पुलिया पाण्याखाली; गावाचा संपर्क तुटतो :-

पाणीप्रश्नासोबतच कोयनगुडा गावाला भामरागड मुख्यालयाशी जोडणाऱ्या पुलियाची समस्याही ग्रामस्थांनी मांडली. पावसाळ्यात नदी-नाल्यांचा जलप्रवाह वाढल्यानंतर ही पुलिया पाण्याखाली जात असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. परिणामी गावाचा भामरागड मुख्यालयाशी संपर्क तुटतो. विशेषतः रुग्णांना उपचारासाठी नेणे, विद्यार्थ्यांची ये-जा, तसेच बाजारपेठ आणि शासकीय कामांसाठी मुख्यालयात जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येमुळे ग्रामस्थांचे जनजीवन प्रभावित होत असून केवळ तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी पुलियाची उंची वाढविणे किंवा आवश्यकतेनुसार कायमस्वरूपी पर्यायी बांधकाम करणे गरजेचे असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. कोयनगुडा गावाचा पावसाळ्यातही भामरागडशी संपर्क कायम राहावा, नागरिकांना सुरक्षित दळणवळणाची सुविधा मिळावी आणि मूलभूत समस्यांमधून त्यांची सुटका व्हावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी युवानेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम, अर्जुन आलम (भाजप तालुकाध्यक्ष, भामरागड), तपेश हलदार (नगर उपाध्यक्ष, नगरपंचायत भामरागड) यांच्यासह विविध पदाधिकारी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
