Tuesday, November 17, 2026
HomeGadchiroliरोहित पठारे हत्याप्रकरणी न्यायासाठी काँग्रेस आक्रमक; फरार आरोपींना तातडीने अटक करून फास्ट...

रोहित पठारे हत्याप्रकरणी न्यायासाठी काँग्रेस आक्रमक; फरार आरोपींना तातडीने अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन; पीडित कुटुंबाला आर्थिक मदत, शासकीय नोकरी व पोलीस यंत्रणेच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी,

गडचिरोली, 16 नोव्हेंबर 2026 :-छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरात रोहित पठारे यांची अत्यंत क्रूर आणि अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली असून, या हत्येदरम्यान जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचाही आरोप आहे. या घटनेचा अनुसूचित जाती विभाग काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून, पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले.

ही घटना केवळ एका व्यक्तीची हत्या नसून सामाजिक सलोखा आणि माणुसकीला काळिमा फासणारी आहे. पुरोगामी महाराष्ट्रात जातीय द्वेषातून अशा प्रकारच्या घटना घडणे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याची भूमिका अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे यांनी मांडली.

या प्रकरणातील फरार असलेल्या उर्वरित सर्व आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, प्रकरणाचा तपास राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या देखरेखीखाली करण्यात यावा, तसेच तपासात दिरंगाई करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

तसेच या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी. पीडित रोहित पठारे यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या नियमानुसार तातडीने आर्थिक मदत, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी आणि आवश्यक संरक्षण देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली.

रोहित पठारे यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा केला जाईल, अशी भूमिका रजनीकांत मोटघरे यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी काँग्रेस कमिटीचे प्रभारी जिल्हाध्यक्ष पंकज गुड्डेवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, नगरसेवक रमेश चौधरी, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश महासचिव नंदूभाऊ वाईकर, तालुकाध्यक्ष वसंतराव राऊत, आनंदराव पारधी, परिवहन सेलचे अध्यक्ष रुपेश टिकले, हेमंत मोहितकर, जितेंद्र मुनघाटे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular