VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी
गडचिरोली, २९ नोव्हेंबर २०२३ ::- मर्जीतल्या कंत्राटदारांना कामे मिळवून देत गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेल्या लिपिकाला दोन वर्षे दुसरीकडे बदली करून नंतर त्याच कार्यालयात तीच जबाबदारी दिल्याचा प्रताप अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागात झाला आहे. यासंदर्भात शिवसेना (उबाठा गट) जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी २८ नोव्हेंबरला तक्रार केली आहे. वादग्रस्त कर्मचाऱ्यांवर ठोस कारवाईऐवजी क्रिमपोस्ट दिल्याने बांधकाम विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
आलापल्ली सार्वजनिक बांधकाम कार्यालयातील निविदा लिपिक इम्रान शेख यांच्याविरुद्ध ही तक्रार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख रियाज शेख यांच्या तक्रारीनुसार, २०१८-२०१९ मध्ये इम्रान शेख निविदा लिपिक या पदावर कार्यरत होते.
विशिष्ट कंत्राटदारांचे हित साधण्यासाठी त्यांनी निविदा प्रसिद्ध न करता कंत्राट दिले. इतर कंत्राटदारांच्या तक्रारीनंतर इम्रान शेख यांना केवळ कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर त्यांची सिरोंचा येथे बदली केली. त्यांचा प्रभार एटापल्ली उपविभागातील दीपक भोसले यांना दिला. काही कालावधीनंतर सदर निविदा कक्षात भास्कर चारी यांना नेमणूक देण्यात आली. मात्र, मर्जीतल्या कंत्राटदारांनी काही राजकीय नेत्यांना हाताशी धरून इम्रान शेख यांची आलापल्ली कार्यालयात बदली केली. विशेष म्हणजे निविदा लिपिक म्हणूनच त्यांना जबाबदारी मिळाली.
या माध्यमातून मर्जीतल्या कंत्राटदारांना कामे दिली जात असल्याचा आरोप रियाज शेख यांनी केला आहे. इम्रान शेख यांना या पदावरून हटवून त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली- आहे. सध्या एक कोटी ३० लाखांची कामे सुरू आहेत. ती तत्काळ रद्द करावीत, अशी मागणी रियाज शेख यांनी केली आहे.
अहेरीतील निकृष्ट कामे कोणाच्या भरवशावर.
अहेरी उपविभागात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा दर्जा सुमार असल्याची टीका ‘नेहमीच होते. अशी कामे करून हित साधण्यासाठी काही कंत्राटदार लॉबी राजकीय नेत्यांना हाताशी धरून वादग्रस्त व गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या कर्मचाऱ्यांची महत्त्वाच्या पदांवर नेमणूक करत असावेत, असा अंदाज देखील व्यक्त होत आहे. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी अधिकारी देखील बोटचेपी भूमिका घेतात, असे दिसत आहे.
मी रुजू होऊन वर्षही झालेले नाही. संबंधित कर्मचाऱ्याची नियुक्ती मी येण्यापूर्वीच झालेली आहे. आज नेमकी काय तक्रार आली.. त्याची चौकशी करावी लागेल. त्यानंतर तुमच्याशी सविस्तर बोलतो.
– बी.डी. रामटेके, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, आलापल्ली
