Saturday, September 12, 2026
HomeAheriमध्यरात्रीच्या आगीने तीन संसार बेचिराख...

मध्यरात्रीच्या आगीने तीन संसार बेचिराख…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची तत्काळ धाव,

गडचिरोली /अहेरी, ०६ मार्च २०२६::- तालुक्यातील जोगनगुडा (उमानूर) येथे मध्यरात्री अचानक लागलेल्या भीषण आगीत तीन कुटुंबांचा संसार अक्षरशः राखेत मिसळला असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत धान्य, कपडे, भांडी, रोख रक्कम व घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. या संकटात माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेटचे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी आपदग्रस्त कुटुंबीयांच्या वेदनांवर मायेची फुंकर घालत तात्काळ मदतीचा हात दिला.

अहेरी तालुका मुख्यालयापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या जोगनगुडा (उमानूर) येथे मलय्या शंकर बोरुकुट, प्रसादराव शंकर बोरुकुट व नागेश शंकर बोरुकुट ही तीन कुटुंबे एकत्र वास्तव्यास होती. ३ मार्च रोजी रात्री सर्वजण जेवण करून झोपले असताना मध्यरात्री अचानक घराला भीषण आग लागली.

आगीचे लोळ पाहून शेजाऱ्यांनी आरडाओरड करत कुटुंबीयांना जागे केले. वेळीच घराबाहेर पडल्यामुळे जीवितहानी टळली; मात्र काही मिनिटांतच घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्याची कोणतीही संधी कुटुंबीयांना मिळाली नाही.

या आगीत घरातील धान्यसाठा, कपडे, भांडी, रोख रक्कम, कागदपत्रे व संसारोपयोगी साहित्य पूर्णतः नष्ट झाले. आयुष्यभराची कमाई डोळ्यादेखत राखेत मिसळल्याने बोरुकुट कुटुंबीय उघड्यावर आले असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी क्षणाचाही विलंब न करता भाजप तालुका अध्यक्ष विकास तोडसाम व उपाध्यक्ष संजय अलोने यांच्या मार्फत तात्काळ आर्थिक मदत पाठविली. त्यांनी कुटुंबीयांना धीर देत या कठीण प्रसंगात आम्ही तुमच्या सोबत आहोत. या संकटातून उभे राहण्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल असे आश्वासन दिले.

यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या तत्काळ हस्तक्षेपामुळे आपदग्रस्त कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या मदतीबद्दल कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त केली.

पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई द्या – राजे अम्ब्रिशराव आत्राम :- 

या आगीमध्ये तीन कुटुंबांचे प्रचंड नुकसान झाले असून शासनाने तातडीने पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी ठाम मागणी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केली आहे. त्यांनी तहसीलदारांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular